
बहुतेक व्यक्तींचा आर्थिक वर्षाच्या शेवटी किंवा नियोक्त्याने जास्त कर वजा करण्याच्या महिन्यात कर बचत करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करण्याकडे कल असतो. कर नियोजन करण्यास उशीर केल्याने त्यांना कर बचत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकरकमी रकमेची गुंतवणूक करावी लागली आणि त्या काळात रोख रकमेच्या तुटवड्याचा सामना करावा लागला. आर्थिक वर्षात होणाऱ्या अंदाजित उत्पन्नाच्या आधारे वर्षाच्या सुरूवातीस करांची योजनाबद्ध पद्धतीने योजना आखणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. यामुळे उत्पन्न किंवा नफ्याचा अंदाज घेण्यासाठी आणि उत्पन्नातील कोणत्याही चढउतारांसाठी कर समायोजित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. कर नियोजन लवकर सुरु करण्याच्या विविध फायद्यांबद्दल सांगताहेत क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर्चित गुप्ता.
योग्य कर-बचत करण्याचा मार्ग निवडा आणि चक्रवाढ शक्तीचा आनंद घ्या:
कर वाचविताना, आपल्याला केवळ कर कमी करण्याची आवश्यकता नाही. आपले कर नियोजन आपल्या गुंतवणूकीच्या नियोजनासह एकत्र करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला आपला दीर्घकालीन निधी तयार करण्यात आणि आपले कर वाचविण्यात मदत मिळेल. असे अनेक कर बचतीचे पर्याय आहेत ज्यात आपण गुंतवणूक करुन आपला कर वाचवू शकता परंतु सर्वात कार्यक्षम म्हणजे ते आपली आर्थिक सुरक्षाही सुनिश्चित करतात. म्हणून, जर आपण लवकर गुंतवणूक सुरू केली तर आपण त्यानुसार आपले कर वाचवू शकता आणि पुन्हा गुंतवणूक करू शकता. पुन्हा गुंतवणूक केलेली रक्कम चक्रवाढ शक्तीसह काही कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात वाढेल.
नियमित आणि पद्धतशीर गुंतवणूकीमुळे असमान कर कपात कमी होईल:
आपल्या कर नियोजनाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी एकरकमी कर भरणा टाळणे आहे. हे टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चालू वर्षासाठी आपल्या कर देयकाची गणना करणे आणि नंतर आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशांची दरमहा गुंतवणूक करणे आहे. यामुळे मासिक आधारावर स्त्रोतावरील कर कपात कमी होईल आणि आपले उत्पन्न वाढविण्यास मदत मिळेल. जर आपण शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिल्यास आणि वर्षाच्या अखेरीस एकरकमी गुंतवणूक केल्यास स्त्रोतावर मोठ्या प्रमाणात कर कपात केली जाईल. यामुळे आपल्यावर आर्थिक संकट येऊ शकते. नियमित आणि पद्धतशीर गुंतवणूकीमुळे शेवटी तुम्हाला प्रचंड एकरकमी कर भरावा लागणार नाही.
सर्व उपलब्ध कर बचत पर्याय वापरा आणि जास्तीत जास्त बचत करा:
करदात्यांसाठी कर बचत करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सर्व पर्यायांकडे पाहणे आणि आपल्या कर बचतीस चालना देण्यासाठी तुलना करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे.
आयकर अधिनियमातील अध्याय VI-A च्या कलम ८०सी हा पहिला आणि मुख्य पर्याय आहे. तुम्ही पीपीएफ, एनएससीमध्ये पंचवार्षिक मुदत ठेव, जीवन विमा प्रीमियम भरणे, कर-बचत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता आणि वर्षाकाठी १.५ लाख रुपयांपर्यंतची वजावट मिळवू शकता. या गुंतवणूकींसह आपण कलम ८०सी अंतर्गत मुलांची शिकवणी फी, गृहकर्ज परतफेड अशा विविध खर्चांचा दावा देखील करू शकता.
त्याचप्रमाणे, भरलेल्या आरोग्य विमा प्रीमियमसाठी आपण आर्थिक वर्षात २५,००० रुपयांपर्यंतच्या वजावटीचा दावा करू शकता. कलम ८०सीच्या १.५ लाख रुपयांव्यतिरिक्त आपण राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) गुंतवणूक करू शकता आणि कलम ८०सीसीडी अंतर्गत ५०,००० पर्यंत वजावटीचा दावा करू शकता. निर्दिष्ट निधी किंवा धर्मादाय विश्वस्त संस्थांना दिलेल्या देणग्यांसाठी कलम ८०जी अंतर्गत पूर्ण किंवा अंशतः दावा केला जाऊ शकतो. कलम ८०ईई अंतर्गत शैक्षणिक कर्जावर भरलेल्या व्याजावर कपात मिळवणे, कलम ८० टीटीए अंतर्गत बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजासाठी वजावट मिळवण्यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत.
अध्याय VI-A व्यतिरिक्त आपण स्वत:च्या ताब्यात असलेल्या मालमत्तेसाठी जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत गृहनिर्माण कर्जावर भरलेल्या व्याजाचा दावा देखील करू शकता. वर्षाच्या सुरूवातीसच वरील सर्व मार्ग जाणून घेणे आणि वापरण्याने आपले कर दायित्व मोठ्या प्रमाणात वाचेल.
आपल्या करांचे समंजसपणे कसे नियोजन करावे?
टप्पा १: आयकर अधिनियम, 1961 च्या विविध कलमांतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांची ओळख करून आणि त्यांची तुलना करा.
टप्पा २: विवाह, मुलांचे शिक्षण यासारख्या आपल्या विशिष्ट दीर्घकालीन लक्ष्यांसह आपली कर-बचत लक्ष्ये संरेखित करा.
टप्पा ३: आपल्या जोखमीच्या क्षमतेनुसार आधारित मार्ग निवडा आणि त्यात गुंतवणूक करा. उदाहरणार्थ, करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील एखादी व्यक्ती किंवा उच्च उत्पन्न संरचना असलेली व्यक्ती जास्त जोखीम घेण्यास तयार असते. कर-बचत म्युच्युअल फंड, युलिप्स किंवा एनपीएस यासारख्या बाजारपेठेशी संबंधित पर्यायांमध्ये तो आपली ८०% पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतो.
टप्पा ४: एकरकमी गुंतवणूक टाळा आणि पद्धतशीर गुंतवणूक योजनेकडे वळा. यामुळे आपल्याला वर्षाच्या मध्यभागी रोख रकमेची टंचाई जाणवणार नाही.
जरी या आर्थिक वर्षाचे निम्मे वर्ष उलटून गेले असले तरी आपण अद्याप आपल्या करांचे नियोजन करू शकता आणि आपली सद्यस्थिती काय आहे आणि उर्वरित वर्षात कोणते समायोजन केले जाऊ शकते ते पाहू शकता. जर आपण शेवटच्या मिनिटापर्यंत कर नियोजनाची प्रतीक्षा केल्यास आपली बचत कमी होईल आणि गुंतवणूक अकार्यक्षमरित्या केली जाईल. जर आपण यापूर्वीच आपल्या करांचे नियोजन केले असेल तर पुन्हा आपल्या नियोजनाचा आढावा घेऊन आपण कर वाचविण्याच्या योग्य मार्गावर आहात की नाही हे तपासू शकता.
















