रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीतल्या मांडवी सुमद्रकिनारी मृताअवस्थेत आढळून आलेल्या समीर वणू या तरुणाची हत्या केल्याचा संशय व्यक्त कुटुंबियांनी केला आहे. समीरचे भाऊ तौफिक वणू यांनी याप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह चौघांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन पोलीसांनी गोवंडी शिवाजीनगर येथील चौघांविरुद्ध भा.दं.वि.क ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
गोवंडी येथे रहाणार समीर हा सुमारे महिनाभरापुर्वी कोकणनगर येथे राहणार्या आपल्या भावाकडे आला होता. नाचणे नारायणमळी येथे भावाच्या घराचे काम सुरु असल्याने तो तेथे काम करित होता. रत्नागिरीत येण्यापुर्वी म्हणजेच जवळपास महिनाभरापुर्वी मुंबई गोवंडी येथे दोन गटात राडा झाला होता. त्यानंतर समीरसह त्याच्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई न्यायालयात समीरने अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तो रत्नागिरीत भावाकडे आला होता. लोकेशन मिळू नये, यासाठी त्याने मोबाईल वापरणेही टाळले होते. दरम्यानच्या काळात त्याला जामीनहि मंजूर झाला होता. दरम्यान ११ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास समीर व त्याचा मुंबईतला भाऊ दोघेहि मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडले. तु पुढे जा मी रेल्वेस्टेशनला येतो असे समीरने आपल्या छोट्या भावाला सांगितले. समीरसोबत कपड्याची बॅग होती. रात्री १२.३० पर्यंत समीर रेल्वेस्थानकात न पोहोचल्याने दुसरा भाऊ रेल्वेने मुंबईला पोहोचला. त्यानंतर सोमवारी समीरचा मृतदेह मांडवी नजिकच्या समुद्रकिनारी आढळून आला होता. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चौकशी अंती तो समीर वणुचा असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी समीरचे सर्व भाऊ रत्नागिरीत दाखल झाले होते. यावेळी आपल्या भावाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी लेखी तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.
शहर पोलीसांनी अली शेख उर्फ लालू, शब्बीर बंगाली, पंकज गुप्ता, वहिदूल अब्दूल सय्यद बारी यांच्या विरुद्ध भा.दं.वि.क ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.