मुंबई, (निसार अली) : मुंबईला नोकरिसाठी आले, तरी गावची ओढ काही जात नाही. आपल्या गावाचा विकास व्हावा, तेथील प्रश्न सुटावेत यासाठी अनेकजण झटत असतात. निलेश प्रभू यांनीही याचप्रमाणे काम करत आपल्या गावातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी सरकारी दरबारी पाठपुरावा केला. आता त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी गावात वर्षानुवर्षे भेडसावणारा पाणीप्रश्न सुटण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मूळचे तारामुंबरीचे असणारे आणि मुंबईत स्थायीक झालेले निलेश यांनी सरकारच्या संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला होता. यानंतर त्यांनी सूचवलेल्या जागेवर पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प उभारता येऊ शकतो, असा प्राथमिक अंदाज जलसंधारण विभागा कणकवली मुख्य अभियंता यांनी वर्तवला आहे.
गावाच्या उत्तरेला मुरुमंणे या ठीकाणी पावसाळी नदी आहे. पावसाळ्यात या नदीतून लाखो लिटर पाणी समुद्रात वाहून जाते. या नदी पात्रात पांडवांची ढोल या ठीकाणी बारमही वाहणारा झरा आहे. याकडे प्रशासन व स्थनिकांनी दुर्लक्ष केले आहे. याच गावातील निलेश प्रभू यांनी सरकारच्या संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून या ठिकाणाकडे लक्ष वेधले. यामुळे येथील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता आहे. तसेच मालाड पश्चिम चे आमदार अस्लम शेख यांनीही या बाबत विधानसभेत याबाबत मांडलेली सूचना मांडली होती.