कोकण दौऱ्यात आठवलेंनी रायगड आणि रत्नागिरीतील गावांना दिल्या भेटी
दापोली, 13 June :राज्यात तीन पक्षाचे तिघाडी सरकार असल्याने यांच्यात बिघाडी झाली आहे. ताळमेळ नसल्याने सरकार निर्णय घेण्यास अक्षम्य दिरंगाई करीत आहे. त्यामुळे 10 दिवस झाले तरी कोकण ला शासनाची मदत मिळाली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाई कारभारावर आम्ही नाराज आहोत . मात्र काँग्रेस पक्ष ही नाराज आहे. काँग्रेस पक्षाच्या 42 आमदारांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले मात्र सरकार च्या महत्वाच्या निर्णयात काँग्रेस ला विश्वासात घेतले जात नाही अशी जाहीर नाराजी काँग्रेस च्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस ला जर विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा असे आवाहन रामदास आठवले यांनी आज केले. कोकणवासी महाविकास आघाडी सरकार वर तीव्र नाराज असल्याचे कोकण दौऱ्यात आपण पाहिले असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळाने कोकण सर्व उध्वस्त झाले आहे.कोकण हे निसर्ग रम्य आहे. येथील पर्यटन व्यवसाय; शेती; बागायती ; मच्छिमारांच्या बोटी; गावांमधील घरे; समाजमंदिरे उध्वस्त झाली आहेत.मात्र अद्याप वादळग्रस्त कोकण ला शासनाने कोणतीही मदत दिलेली नाही. या नैसर्गिक संकटात कोकण ला शक्ती देण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित कोकण ला मोठे मदतीचे पॅकेज द्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे. केंद्र सरकार कडून कोकणला भरीव मदत देण्यासाठी आपण पंतप्रधानांना पत्र देणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले.