रत्नागिरी (आरकेजी): इंग्रजांना ठणकावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील शाळेत कुत्र्यांची नसबंदी करण्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे. नगरपरिषदेने मात्र महापुरुषाचा अवमान करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे स्पष्टीकरत देत कातडी वाचविण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे नागरिक संतापले असून नगरपरीषदेला लाखोली वाहत आहेत.
रत्नागिरी सध्या कुत्र्यांची नसबंदी सुरु आहे. रत्नागिरी शहरात कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता नागरिकांच्या तक्रारींमुळे नगरपरिषदेनं कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कराडच्या एका संस्थेला हे कंत्राट देखील देण्यात आलं. या संस्थेने सध्या आपलं कामही सुरु केलं आहे. मात्र यासाठी लागणारी जागा नगरपरिषदेने उपलब्ध करुन दिली ती शहरातील एक शाळा असून, या शाळेला ऐतिहासिक महत्व आहे. सध्या ही शाळा धोकादायक असल्यानं बंद आहे. मात्र याच शाळेत लोकमान्य टिळक यांनी शिक्षण घेतलं. त्यामुळे या शाळेचं महत्व वेगळ आहे. याच शाळेला लोकमान्य टिळकांचं नाव देण्यात आलं आहे. परंतु सध्या इथं कुत्र्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकार्यानी हे काम ताबडतोब थांबवावं अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी केली आहे.
सध्या हि शाळा धोकादायक आहे, त्यातच जागा मोठी आहे, त्यामुळे कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना ठेवण्य़ासाठी हि जागा सुरक्षित आहे. लोकमान्य टिळक यांच्याबद्दल आम्हालाही आदर आहे. अशा या महापुरुषाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नगरपरिषदेचा नसल्याचं नगराध्यक्ष राहूल पंडित यांनी म्हटलं आहे. तसेच या शाळेत घेण्यात येणारे खासगी क्लासेस चालवणाऱ्या संस्थेला जागा सोडण्याच्या सुचना दिल्या जातील आणि त्यांना नवीन जागा देण्यात येईल, असंही नागराध्यक्षांनी म्हटलं आहे.
शहरात होणा-या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नगरपरिषदेने कुत्र्यांच्या नसबंदीचा उपक्रम सुरु केला आहे. मात्र टिळक ज्या शाळेत शिकले त्या शाळेत कुत्र्यांची नसबंदी सुरु केल्यानं आता नगराध्यक्षांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु झाला आहे.