अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना
सिंधुदुर्ग दि. १५ : कणकवली येथील पुलाच्या बांधकामाची भिंत कोसळणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये त्यांनी या सूचना दिल्या.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर. पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सलीम शेख, ठेकेदार कंपनीचे श्री. गौतम, कन्सलटंट कंपनीचे प्रतिनिधी, संदेश पारकर, संजय पडते आदी मान्यवर उपस्थित होते.
महामार्गाच्या कामाची पूर्ण चौकशी करण्यासाठी श्री. पोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, नेमलेल्या समितीने आठ दिवसात आपला अहवाल सादर करावा. जो पर्यंत महामार्गाच्या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही, ठेकेदाराने नियमानुसार काम केले आहे किंवा कसे याचा संपूर्ण अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांचे एकही बील मंजूर करू नये. कामातील बेजबाबदारपणाबद्दल ठेकेदारासह सर्व जबाबदार यंत्रणा व व्यक्ती यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी यासाठी पाठपुरावा करावा. कणकवली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यालय असावे, या ठिकाणी ठेकेदार कंपनी आणि कन्सल्टंट कंपनी यांचे जबाबदार अधिकारी कायम उपस्थित असावेत. सध्या पडलेल्या भिंतीची तात्पुरती दुरुस्ती सुरू करावी. पावसाळ्यानंतर ती भिंत पूर्ण काढण्यात यावी. ज्याठिकाणी सध्या भराव आहे त्या ठिकाणी पिलरचा पुल उभारण्यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने केंद्राकडे सादर करावा. महामार्गावरील तसेच मोऱ्यांमधून योग्यरित्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी तातडीने कार्यवाही करून काम सुरू करावे. महामार्गावर एखादा अपघात झाल्यास ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या संदर्भात दोन दिवसात पुन्हा बैठक घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.
या बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. सामंत यांनी स्वतः सर्व अधिकारी यांच्या समवेत कणकवली येथे महामार्ग पुलाची भिंत पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी अधिकारी वर्ग व स्थानिकांकडून सर्व समस्या जाणून घेतल्या.