टागोर नगर येथे पोलिसांसह पालिका प्रशासनाची टोलवाटोलवी, नियम धाब्यावर |
मुंबई : पालिकेच्या क्रिडांगणात विवाह सोहळ्यासाठी परवानगी मिळवून मध्यरात्रीपर्यंत तो साजरा करण्याचा प्रकार काल (ता. २६) घडला आहे. स्थानिकांनी या विरोधात पालिका आणि पोलीस यांना तक्रार करूनदेखील दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
टागोरनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिडांगणावर राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने सामुदायिक निकाहाच्या नावाखाली स्वत:च्याच कन्येचा विवाह सोहळा येथे ठेवला, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते चेतन अहिरे यांनी केला आहे. त्यासाठी या नेत्याने समध फाऊंडेशनच्या अंतर्गत सामुदायीक निकाह सोहळा घेत आहोत, असे सांगून पालिकेचीही दिशाभूल करण्याचा उद्योग केला आहे, असे अहिरे म्हणाले आहेत.
रविवारी मोठ्या दिमाखदार पध्दतीने सोहळा साजरा झाला. सुमारे 20 खासगी सुरक्षा रक्षक, ड्रोन कॆमेरेही, क्रेनच्या सहाय्याने वधुवरांचा प्रवेश असे त्याचे भव्यदिव्य स्वरुप होते. सामुदायीक सोहळा साध्यापणाने साजरा होतो. परंतु येथे साधेपणाचा लवलेशही दिसला नाही, असे अहिरे यांनी सांगितले.
याप्रकरणी अहिरे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादीच्या उत्तर-पूर्व जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सिराज अहमद यांच्या कन्येचे हे लग्न होते.
नियमानुसार ५० टक्के जागा खेळण्य़ासाठी सोडणे आवश्यक होते. तसेच २६ मार्चला लग्न असताना २३ मार्चपासून काम सुरु करून संपूर्ण क्रिडांगणावर कब्जा करण्यात आला. २६ तारखेला दिमाखदार सोहळा झाला, त्यावेळी रात्री 12 पर्यंत मोठ्या आवाजात गाणी सुरूच होती. याबाबत स्थानिक पोलीस ठाणे, 100 नंबरवर दुरध्वनी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर त्रासलेल्या रहिवाशांनी रात्री 11.30 ला परिमंडळ 7 चे उपायुक्त सचिन पाटील यांना दूरध्वनी केला. यानंतरच गाणी बंद करण्यात आली.
सातत्याने तक्रार करुनही पालिकेचे दुर्लक्ष
चेतन अहिरे यांनी सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांना निकाह सोहळ्याविरोधात २४ मार्चला पत्र लिहिले होते. तरीही पालिकेचा कोणताही अधिकारी तेथे फिरकला नाही. या आधीही अशा प्रकारचा एक सोहळा या मैदानावर पार पडला होते.
>>>>>
आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लघन केले नाही. सर्व नियम पाळुनच निकाह सोहळा पार पडला आहे. माझ्या विरोधातील हे षडयंत्र आहे. – सिराज अहमद
>>>>
नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई केली जाई. पोलीस स्थानकात गुन्हा नोदंवण्यात येईल.
– सुदर्शन आवरे- सहाय्यक अधिकारी, उद्यान विभाग, पालिका
>>>>>
हे मैदान खेळण्यासाठी आहे. लग्न कारणासाठी त्याचा वापर होणे चुकीचे आहे. दहाविच्या परिक्षाही सुरू आहेत. विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास झाला.
– प्रितम साबळे, मनसैनिक
>>>>>>
पालिकेच्या अधिकार्यांना काल सांगितले होते. मी आता बाहेर आहे, माहिती घेत आहे. – चंदा जाधव, सहाय्यक आयुक्त, एस वॉर्ड