मुंबई : आकांक्षेपुढे गगन ठेंगणे असे आपल्याकडे बोलले जाते. पण चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिकणाऱ्या १९ वर्षीय प्रभात कोळीसाठी जगातले सातही समुद्र कमी ठरले आहेत. आतापर्यत सहा समुद्र पोहून पार करणाऱ्या प्रभातला आता कॅलिफोर्निया ट्रिपल क्रॉऊन खुणावत असून हे यश मिळवण्यासाठी तो आता पुढील आठवड्यात अमेरिकेला रवाना होणार आहे.
वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या मान्यतेनुसार कॅलिफोर्नियातील ऍनाकॅपा टू मेनलँड (सांताबारबरा), लेक तहाऊ आणि कॅटरिना चॅनेल हे कॅलिफोर्निया ट्रिपल क्रॉऊन म्हणून ओळखले जातात. यातील कॅटरीना चॅनेल प्रभातने २०१६ साली पोहून पार केले होते. आता कॅलिफोर्निया ट्रिपल क्रॉ ऊन पूर्ण करण्यासाठी प्रभात प्रशांत महासागरात पोहायला उतरणार आहे. प्रभात ३ जुलै रोजी ऍना कॅपा टू मेनलँड हे २० किलोमीटरचे अंतर पोहून जाणार आहे. हे अंतर ५ तासाच्या आत पोहून पार करण्याचे लक्ष्य प्रभातने आपल्या समोर ठेवले आहे. १९७८ पासून केवळ ७८ जलतरणपटू हे अंतर पोहून पार करण्यात यशस्वी ठरले आहेत. हे अंतर आतपर्यत ४ तास ३८ मिनिटात वेगवानरित्या पोहण्याचा उच्चांक आहे.
त्यानंतर प्रभात १७ जुलै रोजी ३० किलोमीटर अंतर असणारा लेक तहाऊ पोहणार आहे. कॅलिफोर्नियात २००० मीटर उंचीवर असलेल्या लेक तहाउमधील पाण्याचे तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअस इतके थंड असते. याशिवाय याठिकाणी ऑक्सिजनची मात्राही कमी असल्यामुळे लेक तहाऊ मध्ये पोहताना प्रभातचा चांगलाच कस लागणार आहे. लेक तहाऊ आतापर्यत ५८ जलतरणपटूनी पोहून पार केला असून ८ तास ५६ मिनिटे अशी वेगवान वेळ नोंदवण्यात आली आहे. प्रभातने हे अंतर ९ तास ४० मिनिटांत पोहण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
प्रभातची ही मोहीम यशस्वी झाल्यावर कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळवणारा तो पहिला भारतीय जलतरणपटू ठरणार आहे. आतापर्यत अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आणि मेक्सिको या देशातील अवघ्या १३ जलतरणपटूना कॅलिफोर्निया ट्रिपल क्रॉऊन मिळवला आहे.
थंड पाण्यात पोहण्याचा सराव करण्यासाठी प्रभातने थेट नैनिताल गाठले होते. नैनिताल शहरातिला तलावात प्रभातने इंग्लंड च्या दीर्घ पल्ल्याच्या जेष्ठ जलतरणपटू सॅलिमेंटी ग्रॅवीट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. प्रभातवर आपल्या नातवासारखे प्रेम करणाऱ्या आणि मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर किताबाच्या मानकरी असलेल्या सॅलिमेंटी इंग्लडहून त्याला सूचना आणि मार्गदर्शन करत होत्या.
दीर्घपल्ल्याच्या सागरी जलतरणात प्रभातने आपली चांगलीच छाप पाडली आहे. मागील एप्रिल महिन्यात प्रभातने वयाच्या १९ व्या वर्षी सहा समुद्र पोहून पार केले.अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण जलतरणपटू होता. प्रभातने २०१५ मध्ये अराऊंड जर्सी ही ६५ किलोमीटर अंतराची सागरी मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली होती. त्यावेळी पाण्याचे तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअस आणि सुमारे आठ मीटर उंचीच्या लाटा उसळत असताना प्रभातने हे अंतर १० तास ११ मिनिटांत पोहून पार केले होते.