रत्नागिरी (आरकेजी): महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण तसेच बँको पुरस्कार प्राप्त आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अग्रगण्य स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयास नुकत्याच रत्नागिरी दौऱ्यावर येऊन गेलेल्या बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे आमदार प्रसाद यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झालेल्या मंत्री रविंद्र चव्हाण यांचा संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच विधान परिषदेचे नूतन आमदार प्रसाद लाड यांनीही प्रथमच संस्थेला भेट दिल्याबद्दल अॅड. पटवर्धन यांनी त्यांना सन्मानित केले.
संस्थेच्या कामकाजाची माहिती अॅड. पटवर्धन यांनी मंत्र्यांना दिली. एनपीए कर्जांचे शून्य टक्के प्रमाण, १४० कोटींच्या ठेवी, ६० कोटीच्या गुंतवणुका, ९९.९२ वसुली आणि १६ कोटी ५० लाखांचा स्वनिधी अशी भक्कम आर्थिक स्थिती असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. स्वरूपानंद पतसंस्थेला नुकताच सलग दुसर्या वर्षी बँको पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यव्यापी कार्यक्षेत्र झाले असून लवकरच पुणे येथे रत्नागिरी जिल्ह्याबाहेरील पहिली शाखा सुरू होणार आहे. याबद्दल मंत्री चव्हाण व आमदार लाड यांनी पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सचिन वहाळकर, शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, नगरसेवक उमेश कुळकर्णी, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, राजू मयेकर आदी उपस्थित होते.