डोंबिवली, (प्रशांत जोशी) : खोणी येथील श्री गणेश क्रिकेट क्लब तर्फे स्व.चंदुशेठ स्मृती चषक 2019 चे आयोजन खोणी गावात करण्यात आले होते. या मर्यादित क्रिकेट सामन्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. वडवली क्रिकेट संघाने स्व.चंदुशेठ स्मृती चषकाचा बहुमान मिळाला. विजेत्या संघास अंबरनाथ येथील नगरसेवक तुळशीराम चौधरी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
सामन्यांत विजेत्या वडवली क्रिकेट संघास दोन लाख व कै. चंदूशेठ स्मृती चषक तर उपविजेता मनेरे संघास एक लाख व चषकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी विश्वनाथ मस्कर, जि.प. सदस्य रमेश पाटील, केशव पाटील, प्रदीप मोकाशी, विलास पाटील, अनिल पाटील, बंडू पाटील, गुरुनाथ पाटील, रामदास ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रिकेट सामन्यात वाकलन व वाडेघर क्रिकेट संघ तिसऱ्या व चौथ्या क्रमाकांवर आले. त्या संघास प्रत्येकी पन्नास हजार व स्व. चंदूशेठ चषक देण्यात आला. उत्कृष्ट गोंलदाज म्हणून मनेरे संघाचा तेजस भोईर, वाकलण संघाचा केतन म्हात्रे यास फलंदाज म्हणून तर वाडेघरच्या कपील पाटील या खेळाडूंने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा बहुमान पटकावला. वडवली येथील ऋतीक पाटील मालिकावीर ठरला. ऋतीक यास पँशन मोटरबाईक, श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने देण्यात आली.
श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य किरण ठोंबरे हे गेली पाच वर्ष सामने आयोजित करीत आहेत. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख कै. चंदुशेठ ठोंबरे यांच्या स्मरणार्थ सामने सुरु करण्यात आले. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडू पुढे जावा, भारतातील उत्तम खेळाडूसोबत या भागातील खेळाडू खेळावा ही आमची ईच्छा आहे. विविध मान्यवर आम्हाला सहकार्य करतात. अंबरनाथ येथील नगरसेवक तुळशीराम चौधरी मदत करीत असतात. कुणीही भेदभाव बाळगत नाही. विविध धर्माचे, जाती पंथाचे ग्रामस्थ गुण्यागोविंदाने कार्यक्रमात सामील होतात. खोणीचे अनंत महाराज यांचे आशिर्वाद पाठीशी आहेत. रामदास ठोंबरे, गणेश ठोंबरे, संतोष पराड, वासूदेव काका यांचे सहकार्य लाभते. विशेष म्हणजे ग्रामीण विभागात किरण ठोंबरे यांची क्रिकेटपटु म्हणून ओळख आहे.