नवी मुंबई (रुपेश दळवी) : महाराष्ट्रात १ ते ७ जुलै दरम्यान राज्यसरकारच्या वनविभागातर्फे वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वनमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बारा वाजेपर्यंत १४ लाख रोपट्यांचे वृक्षारोपण महाराष्ट्रात झाले. त्यात स्वराधार च्या अंध विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला. ‘स्वराधार’च्या माध्यमातून दादरच्या मेहता अंध विद्यालयातील यात सहभागी झाले होते.
ज्यांना निसर्गाचा आनंद डोळ्यांनी घेता येत नाही अशा स्वराधार संस्थेच्या दृष्टिहीन बांधवांनी व स्वराधार संस्थेच्या कलाकार यांनी आपल्या लघुचित्रपटातून लोकांना आवाहन केले की ‘आम्ही जातोय, तुम्हीही घराबाहेर पड़ा आणि वृक्ष लागवडीच्या ईश्वरीय कार्यास हातभार लावा’. हा व्हिडियो पाहुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कलाकारांचे तसेच संस्थेचे विशेष कौतुक केले आणि १ जुलैला ऐरोली येथे करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडिकरिता आमंत्रित केले होते. हा लघुपट शैलेश पांढरे, प्रविण दौंड, संग्राम गोवर्धने ह्यांनी स्वराधार साठी बनवला. यात वनरक्षक पंकज कुंभार, सुधीर मुनगंटीवार, वनसचिव विकास खारगे ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. लघुचित्रपटाचे छायांकन दिनेश तळवडेकर आणि अमित घाडिगांवकर तसेच एडिटिंग पुष्पक जळगावकर ह्यांनी केले. पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जवाबदारी आहे. स्वराधारच्या माध्यमातून द्रुष्टिहीन मुले व्रुक्षारोपणासाठी सज्ज झाली आहेत. चला आपणही जवाबदार बनूया. आणि या ४ कोटी मिशनमध्ये सहभागी होऊया असे आवाहन स्वराधारच्या संस्थापिका हेमलता तिवारी यांनी केले.
वनमहोत्सवाचा शुभारंभ कार्यक्रम सकाळी ११ वाजता ऐरोली, नवी मुंबई येथील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र येथे पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंदीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,आध्यत्मिक गुरू सदगुरूजी हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वृक्षारोपण करुन कार्यक्रमास सुरूवात केली.