
चिपळूण – इंडियन स्टुडण्ट कौन्सिलतर्फे चिपळूण नागरी सह. पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचा सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हा सोहळा पार पडला.
यावेळी आमदार शेखर निकम, भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उद्योजक राजू जोशी, अभिजीत हेगशेट्ये, संस्थेचे अध्यक्ष प्रा. ज्ञानोबा कदम उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे संबंध होते. कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षणाची सुविधा दिली. त्यानंतरच एस.सी., एस.टी.ला आरक्षण मिळाले. ज्याचे उत्पन्न कमी आहे. त्या लोकांना आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली भूमिका आहे. मात्र, अन्य कुठच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आपले चिपळूणवर प्रेम आहे म्हणूनच आपण या कार्यक्रमाला आलो.
राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कारप्राप्त स्वप्ना यादव म्हणाल्या, शाहू महाराजांचे कार्य हे प्रत्येकालाच आदर्शवत आहे. चिपळूण नागरी सह. पतसंस्था आपले वडील सुभाष चव्हाण यांनी सुरू केली. आज ३३ वर्षांत २२०० कोटींचा टर्नओव्हर झाला आहे. एक हजार कोटींचा कर्जव्यवहार झाला आहे. आज वाशिष्ठी डेअरी पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांना सहाय्य करणारी ठरली आहे, अशी माहिती सौ. यादव यांनी यावेळी दिली. या पुरस्काराबद्दल सौ. स्वप्ना यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.














