रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाच्या पहिल्याच दिवशी १ कोटी ९१ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवसापासून मिळू लागला असून यामुळे या ठेववृद्धी मासात विक्रमी ठेवी जमा होतील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास २० जूनपासून सुरू झाला. तो २० जुलैपर्यंत चालू राहणार आहे. संस्थेच्या ठेवी सध्या ३१० कोटीवरून ३११ कोटी ९१ लाखांवर पोहोचल्या आहेत. ठेववृद्धी मासात या एकूण ठेवी ३२५ कोटींवर पोहोचतील. पहिल्या दिवशी संस्थेच्या १७ शाखांमधून ठेवींचा ओघ सुरू झाला आहे. या ठेववृद्धी मासामध्ये १२ ते १८ महिनेची मुदतीची स्वरूपांजली ठेव योजना जाहीर केली आहे. यामध्ये सर्वसाधारण ८.०० टक्के व महिला / ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी ८.२५ टक्के व्याजदर दिला आहे. १९ ते ६० महिने मुदतीच्या सोहम ठेव योजनेमध्ये सर्वसाधारण ८.२५ टक्के व महिला व ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी ८.५० टक्के एवढा व्याजदर देऊ केला आहे.
शासनाची सर्व प्रमाणे काटेकोर पाळून स्वामी स्वरूपानंद पतसंस्था आजवर काम करत असल्याने संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने विश्वासार्ह, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याने ग्राहकांचा कल ठेवी ठेवण्यासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडे असल्याचे दिसते. काम करणाऱ्या संस्थेमध्ये गुंतवणूक करण्याची संधी ठेवीदार साधतील, असा विश्वास अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.