मुंबई : मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणी स्वाईन फ्ल्युचा प्रादुर्भाव आढळून येत असून पावसाळ्यामध्ये स्वाईन फ्ल्युसह डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेतली. यावेळी साथरोग आजारांवार उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणांनी जनजागृतीवर भर द्यावा असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
राज्यात १ जानेवारी २७ जून या कालावधीत सुमारे ७५८१ स्वाईन फ्ल्यू सदृश रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ७२० रुग्ण बाधीत आढळले असून आतापर्यंत २६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्य शासनाच्यावतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत लसीकरण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यावर्षी जानेवारी ते जून या काळात ३० हजार ४६२ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. स्वाईन फ्ल्युचा प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून ऑसेलटॅमीवीर हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्ल्युच्या उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
स्वाईन फ्ल्युच्या प्रतिबंध आधि नियंत्रणासाठी फ्ल्यू सदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत असून राज्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपचाराची सुविधा असणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयांना स्वाईन फ्ल्यु उपचाराची मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील ४ शासकीय प्रयोगशाळांमार्फत मोफत निदानाची सुविधा करण्यात आली आहे. रेलीगेअर आणि डॉ.लाल पॅथॉलॉजी लॅबसह अन्य १७ खासगी प्रयोगशाळांना स्वाईन फ्ल्युच्या निदानाची मान्यता देण्यात आली आहे. खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी तज्ज्ञ समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खासगी डॉक्टरांनी फ्ल्युच्या रुग्णांवर लक्षणे सुरु झाल्यास दोन दिवसात स्वाईन फ्ल्युचे उपचार सुरु करुणे आवश्यक आहे. त्या व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्त दाब तसेच गरोदर माता अशा अतिजोखमीच्या गटाकडे विशेष लक्ष द्यावे. पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेता जनजागृतीवर भर द्यावा. खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
जुलै महिन्यापासून प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला गती द्यावी. शाळांमधुन विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्युबाबत जाणीव जागृतीचे धडे द्यावेत, असेही आरोग्यमत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी केंद्र शासनाच्या शिघ्र प्रतिसाद समितीचे संकेत कुलकर्णी यांनी मुंबई, ठाणे, पुणे येथील स्वाईन फ्ल्युबाबतचा अहवाल आरोग्यमंत्र्यांना सादर केला. फ्ल्युचे रुग्ण डॉक्टरांकडे उशिरा येतात व त्यांच्यावर उशिरा उपचार होतात, असे या अहवालात म्हटले आहे. यावेळी लेप्टोस्पायरोसिस आजाराबाबतचाही आढावा घेण्यात आला.
बैठकीस साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.सुभाष साळुंखे, आरोग्य संचालक डॉ.सतीश पवार, सह संचालक डॉ.प्रदीप आवटे आदी उपस्थित होते.