रत्नागिरी (प्रतिनिधी): गणेशगुळे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने समुद्रकिनार्याची स्वच्छता करण्यात आली. सरपंच संदीप शिंदे यांच्या पुढाकाराने व कुर्धे येथील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही मोहीम राबवली.
गावच्या विकासासाठी ग्रामस्थांचे योगदान मिळत आहे. शासनाच्या योजना, पायाभूत सुविधांसाठी ग्रामपंचायत योगदान देत असल्याची माहिती सरपंच शिंदे यांनी या वेळी दिली. गणेशगुळे येथील सड्यावर पुरातन गणेश मंदिर आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा पर्यटकांना साद घालतो. आगामी 31 डिसेंबर साजरा करण्यासाठीही अनेक पर्यटक येथे येतील. त्यामुळे स्वच्छता अभियान राबवण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. पर्यटकांनीही येथे अस्वच्छता करू नये, अशी सूचना त्यांनी केली. या ठिकाणी सुरक्षेसाठी टॉवर उभारण्यात आला असून येथे जीवरक्षक कार्यरत आहेत. पर्यटकांनी पाण्यात जास्त खोलवर जाऊ नये, असेही शिंदे यांनी सांगितले.
सुमारे तीन तास समुद्रकिनार्यावर ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षकांनी सफाई केली. पटवर्धन विद्यालयाचे 110 विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. मुख्याध्यापक उदय फडके, सहकारी शिक्षक, सरपंच संदिप शिंदे, उपसरपंच सुचिता जोशी, ग्रामपंचायत सदस्य गौरव फडके, संपदा गुरव, वैभवी तोडणकर, स्वप्नाली नारकर, रवींद्र जोशी उपस्थित होते. तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत लाड, सचिव खरंबळे, कर्मचारी लाड, जीवरक्षक मोहन लाड, सुदेश लाड, पोलीस पाटील संतोष लाड व ग्रामस्थ प्रज्योत गुळेकर, वैभव साळुंके, स्वप्नील गुरव व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.