रत्नागिरी : सध्या रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था खड्ड्यांमुळे फारच दयनीय झाली आहे. शहरातील एक रस्ता असा नाही जिथं रस्त्यावर खड्डा नाही. रस्त्यांंच्या दुरवस्थेबाबत लक्ष्य वेधण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आज अनोखं आंदोलन केलं. रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील खड्यांची अवस्था मांडणारे खड्डेमय रस्त्यांचे प्रदर्शनच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रत्नागिरीत भरवण्यात आले.
रत्नागिरी शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था खड्डेमय आहे. शहरातील माळनाका, मारूतीमंदिर, टिळक आळी, पऱ्याची आळी, काॅग्रेसभुवन, साळवी स्टाॅप इथल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे या खड्डेमय रस्त्यांनी सध्या रत्नागिरीकर चांगलेच बेजार झाले आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांंवर पडलेल्या खड्यांचे प्रदर्शनच रत्नागिरी शहरात भरवण्यात आले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं रत्नागिरीतल्या मुख्य ठिकाणी हे प्रदर्शन भरवलं आहे. खड्डेमय रस्त्यांंची व्यथा या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणी पडलेल्या भल्या मोठ्या खड्यांचे फोटो काढून ते प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. हे अनोख प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक रत्नागिरीकरानी गर्दी केली होती. अनेकांनी या रस्त्यांवरील खड्डयांबाबत नागरपरिषदेबाबत नाराजी व्यक्त केली.
या खड्ड्यांमुळे होडीत बसल्याचा फिल येत असल्याचं प्रदर्शन पहायला आलेल्या काही वाहन चालकांनी सांगितलं. या खड्डेमय अवस्थेला प्रशासन आणि राजकीय पुढारी जबाबदार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. शहराला खड्डेमय करणाऱ्या अशा लोकांना आपण निवडून देताना विचार केला पाहिजे अशी भावना यावेळी काहींनी व्यक्त केली. शहरातील रस्त्यांची कामं ही दर्जेहीन असून, आज रस्त्यांवर 80 टक्के खड्डे आहेत हे असंच सुरू राहिलं तर 100 टक्के रत्नागिरी खड्ड्यांतच राहील अशी टीका माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी यावेळी केली. दरम्यान रत्नागिरीतल्या खड्यांप्रमाणे मोकाट गुरे, उघडी गटारे, कचरा यांचे फोटो देखील या प्रदर्शनात मांडून नगरपरिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले आहेत.