नवी दिल्ली : वाढती लोकसंख्या आणि वातावरणातील बदल हे भारतातील जलस्रोतांसमोरचे महत्वाचे आव्हान असल्याचे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. या संदर्भात नवी दिल्लीत आयोजित चर्चासत्रात ते काल बोलत होते. देशातील पाण्याचा तुटवडा आणि पाण्याशी संबंधित समस्यांच्या निराकरणाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले. देशात उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी सुमारे 78 टक्के पाणी कृषी क्षेत्रासाठी वापरले जाते. 2024 सालापर्यंत देशात लोकसंख्येचा विस्फोट होण्याची शक्यता लक्षात घेत त्या तुलनेत पाण्याची कमतरता भासू शकेल असे ते म्हणाले.
कृषी क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर आवश्यक असल्याचे मत प्रभू यांनी व्यक्त केले. कृषी असो वा उद्योग, सर्वच क्षेत्रांमध्ये पाण्याच्या शाश्वत वापरावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
देशात भूजल पातळीत सातत्याने घट होत असल्याबद्दल प्रभू यांनी चिंता व्यक्त केली. अमेरिकेच्या तुलनेत भारतात कृषी क्षेत्रासाठी भूजलाचा वापर 3 ते 4 पट जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा फेरवापर करुन भूजल स्तर वाढविण्याचे प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.