रामनाथ वैद्यनाथन (लेखक ‘गोदरेज इंडस्ट्रीज’चे ‘सस्टेनॅबिलिटी’ विभागाचे सरव्यवस्थापक आहेत)
‘कोविड-19’च्या प्रादुर्भावामुळे जगावर जे परिणाम झाले, त्यांत नकारात्मक तर बरेच होते, मात्र काही सकारात्मक गोष्टीही घडल्या, हे नाकारून चालणार नाही. जागतिक आरोग्यसेवेला आर्थिक फटका कसा बसू शकतो, हे या प्रादुर्भावाने दाखवून दिलेच, त्याशिवाय जागतिक पर्यावरण आणि उद्योग यांचा सध्याच्या काळात परस्परसंबंध किती गहिरा आहे, हेही यातून दिसून आले. व्यापार-उद्योगाची चक्रे थांबविणारा करोना विषाणू हा प्रत्यक्षात पृथ्वीवरील नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालल्याचा स्पष्ट परिणाम होता.
करोनाच्या महामारीने झालेल्या विध्वंसामध्ये एक सकारात्मक गोष्ट घडून आली आहे. आपले वन्यजीवन पुन्हा जागेवर येऊ लागले आहे. ते वाढत असल्याचे प्रेरणादायक चित्र दिसू लागले आहे. या वन्यजीवनाची छायाचित्रे जगभरातील अनेक लोकांनी गेल्या काही दिवसांत एकमेकांना पाठवली. अर्थात, जैववैविध्याचे झालेले नुकसान भरून निघण्यासाठी विध्वंसक विषाणूचा उद्रेक कारणीभूत ठरणे हे विचित्र आहे आणि त्याची ही फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागली, हे खेदजनक आहे. टाळेबंदी शिथिल होताना, जनजीवन सामान्य स्थितीत येत असताना, वन्यजीवन आता पुन्हा पहिल्यासारखे ‘सामान्य’, लुप्त अवस्थेत जाणार नाही, याची आपण काळजी घ्यायला हवी.
जाणीव व इशारा
व्यवसायांचा विचार केला, तर गेल्या काही महिन्यांत या क्षेत्रांत अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब अशी की, डिजिटल पद्धतीने अनेक व्यवहार सहजपणे घडून येतील, असे आपल्याला यापूर्वी वाटलेही नव्हते, ते घडू लागले आहे. स्वयंचलित यंत्रणा आपल्या उपयोगास आल्या आहेत, आपले कारखाने अधिक चांगल्या प्रकारे चालू आहेत आणि कार्यक्षमता कमी न होता आपण दूरस्थ पद्धतीने काम करू शकत आहोत. कच्चा माल आणि उत्पादित वस्तू यांची वाहतूक सुरळीत सुरू आहे. काही क्षेत्रांतील काही व्यावसायिक एकत्र येऊन, एकमेकांचे स्रोत वापरून काम करीत आहेत, जेणेकरून त्यांना स्वतःला व खरेदीदारांनाही फायदा होऊ शकेल. टाळेबंदीच्या काळात वाहतूक क्षेत्रात काही ठिकाणी नवीन तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण उपाय यांचाही विकास झाला. उदाहरणार्थ, सर्वात अखेरच्या टप्प्यात असणाऱ्या ग्राहकाला मालाचा पुरवठा करण्याचे आव्हान उभे राहिले, तेव्हा ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ने किराणा दुकानदार आणि इतर दुकानांना सॅनिटायझर्स आणि साबण वितरित करण्यासाठी ‘स्विगी’शी करार केला.
या सर्व उदाहरणांमधून दिसून येते की कार्बनचे उत्सर्जन कमी करूनही आपले व्यवहार वेगळ्या पद्धतींनी व कार्यक्षमतेचे चालवता येतात. ब्रिटनमधील ‘नॅशनल क्लायमेट चेंज’ या नियतकालिकाने केलेल्या अभ्यासानुसार, एप्रिलच्या सुरूवातीच्या काळात भारतातील कार्बन उत्सर्जनात 26 टक्क्यांची घट झाली आहे. एकंदरीतच, ‘करोना व्हायरस’च्या उद्रेकाच्या दुष्परिणांमांबरोबरच, उत्पादकता आणि कार्यपध्दतींमध्ये पूर्णपणे बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला एक चांगले निमित्तही मिळाले आहे.
शाश्वताचे पुररुत्थान
नफा मिळवण्याच्या नादात आपणास शाश्वत आणि नैसर्गिक जीवनपद्धतींचा बळी द्यावा लागतो, असे बोलले जाते. मात्र तरीसुद्धा गेल्या काही दिवसांत, शाश्वत, चिरंतन व्यवस्था टिकून राहण्याच्या प्रयत्नांना वेग आलेला आहे. येत्या दोन दशकांमध्ये आपल्याला हवामानाशी संबंधित अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे व त्याकरीता सज्ज राहणे आवश्यक आहे, याची जाणीव उद्योग व्यवसाय क्षेत्राला झालेली आहे. यातून, अनेक उद्योगांनी खनिज इंधनांवरील अवलंबन, पाण्याचा बेसुमार वापर, अन्य नैसर्गिक स्रोतांचे शोषण आणि घातक वायूंचे, पदार्थांचे उत्सर्जन यांचा फेरविचार सुरू केला आहे.
खरे म्हणजे, उद्योगांमध्ये वापरले जाणारे कार्बन आणि पाणी या दोहोंची वास्तविक किंमत उद्योगांनी मोजणे ही काळाची गरज आहे. कार्बनची ठराविक अशी राष्ट्रीय किंमत नसल्यामुळे कंपन्यांनी स्वतःच अंतर्गत पातळीवर त्याची एक किंमत ठरवावी आणि आपल्या उत्पादनाच्या खर्चात ती समाविष्ट करावी. यामुळे हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास वेग येईल, कारण उत्सर्जन कमी करण्याच्या खर्चापेक्षा ते होऊच न देणे अधिक स्वस्त पडेल. अपारंपरीक ऊर्जेचा अवलंब करण्याने कंपन्यांना खनिज इंधनांवरील अवलंबन कमी करण्यात मदत होईल.
घातक वायू व पदार्थांचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपन्या हाती घेऊ शकतील असा दुसरा उपाय म्हणजे त्यांची देखरेखीची यंत्रणा बळकट करणे. ‘गोदरेज’च्या ‘गूड अँड ग्रीन’ या शाश्वत तंत्रज्ञान कार्यक्रमांतर्गत हा एक उपक्रम आहे, ज्यामुळे अगदी मूळ प्रक्रियांपासून आपले विशिष्ट कार्बन उत्सर्जन 55 टक्क्यांपेक्षा कमी करण्यास आम्हाला मदत झाली आहे. आम्ही आमच्या देखरेख यंत्रणेचे डिजिटलायझेशन केले आहे. परिणामी, समस्या घडून गेल्यावर तिचा उहापोह करीत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष वेळेतच तिचा समाचार घेणे आम्हाला शक्य होते.
कंपन्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक असलेले आणखी एक क्षेत्र म्हणजे प्लास्टिक पॅकेजिंग. प्लास्टिकवर बंदी आणण्याविषयी बरीच चर्चा होत असतानाही हे समजून घेणे महत्वाचे आहे, की प्लास्टिकचा वापर ही खरी समस्याच नाही. खरा मुद्दा प्लास्टिकच्या पुनर्वापराचा आहे. प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करून ते पुन्हा दैनंदिन वापरात आणण्याऐवजी कचरा कुंडीत टाकले जाते. खरे तर प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञानाची आपल्याकडे कमतरता नाही; तर प्लास्टिक साठवणे आणि त्याचे कार्यक्षमतेने विभाजन करणे यांची आपल्याकडील पद्धत चुकीची आहे. या समस्येचे निराकरण करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे प्लास्टिक पुनर्वापराच्या प्रक्रियेतील त्रुटी शोधून काढणे. उदाहरणार्थ, कचरावेचक कामगारांच्या श्रमाला वेगळे वळण देऊन प्लास्टिकच्या वस्तू गोळा करण्याचे कांम सुरक्षितपणे, विशिष्ट पद्धतीने झाले, तर प्लास्टिक पुनर्वापराचे काम गतिमान होईलच, त्याशिवाय अनेकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळू शकतील. प्लास्टिक पुनर्प्रक्रियेची कार्यक्षमता वाढविण्यामुळे ‘व्हर्जिन प्लास्टिक’चा वापरही कमी होईल, परिणामी उत्सर्जनाचे प्रमाण कमी होऊ शकेल.
आत्मपरीक्षण करण्याची वेळ
सध्या वस्तूंच्या खपात असलेली कमतरता आणि उत्पादनातील तूट ही मुख्य समस्या व्यवसायांना भेडसावत आहे. परंतु आत्मनिरीक्षण करण्याची आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची हीच योग्य वेळ आहे. शाश्वत व टिकाऊ प्रणालींमधून ज्या कंपन्या बळकट झालेल्या असतात, केवळ त्याच आपत्कालीन परिस्थितीत टिकून राहतात. आर्थिक कामगिरी निर्देशांकात असे दिसून आले आहे की गेल्या काही वर्षांत पूर आणि वणव्यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले असले, तरी चिरंतन स्वरुपाच्या प्रणाली वापरणाऱ्या व मूलभूतरित्या मजबूत अशा कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कमकुवत कंपन्यांच्या तुलनेत टिकून राहिलेले आहेत.
सुमारे दशकभरापूर्वी एक लोकप्रिय धारणा अशी होती, की शाश्वत मूल्ये व विकास हे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. तथापि, आता तसे राहिलेले नाही. उद्योग-व्यवसायांनी आता आपल्या कार्यप्रणालीमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे. उत्पादकता वाढविणे आणि त्याचवेळी पर्यावरण जपणे ही कसरत करणे त्यांना भागच आहे. व्यापक अर्थाने, व्यवसायातील यश म्हणजे सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्माण करणे हेच होय. आपली पृथ्वी ही या संदर्भात सर्वात मोठी भागधारक आहे, म्हणूनच आता शाश्वत प्रणालींबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही.