रत्नागिरी : एकीकडे मी शिवसेनेतच आहे हे सांगायचं तर दुसरीकडे भाजपमध्ये माझा पक्षप्रवेश करा हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायचं, केवढी ही बेईमानी अशा शब्दांत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सूर्यकांत दळवी यांना फटकारलं आहे. ते आज दापोलीत शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. 3 ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजता सूर्यकांत दळवी हे मुख्यमंत्र्यांना भेटले, भाजपात घ्या हे सांगण्यासाठी भेटले, हे जर खोटं असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं सांगत रामदास कदम यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोलीमध्ये पार पडला. यावेळी रामदास कदम यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर टीका करत असलेल्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला. यावेळी त्यांनी नारायण राणे, आमदार संजय कदम यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. या मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, युवा सेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य योगेश कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रामदास कदम यांनी सूर्यकांत दळवी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत त्यांचा जोरदार समाचार घेतला. रामदास कदम यांना आमदारकीचं तिकीट मिळावं यासाठी मी बाळासाहेबांकडे घेऊन गेलो होतो, त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मी शब्द टाकला होता आणि रामदास कदमांमुळे माझा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता अशी टीका दळवी यांनी केली होती.. या टीकेला प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी जुन्या गोष्टींचा दाखला दिला. दळवी हे धादांत खोटं बोलत असून मी 1972 पासून राजकारणात आहे. दळवी जेव्हा पहिल्यादा निवडणूकिला उभे राहिले त्यावेळी मी त्यांना 50 हजार रुपये दिले होते.. माझ्या गाडीतून ते फिरायचे, त्यांना गाडी घेण्यासाठी मीच मदत केली होती. ते राहत असलेल्या बंगल्याची जागा मी स्वतः घेऊन दिली आहे. पण आज हा बेईमान झाला आहे. एकीकडे शिवसेनेत आहे असं सांगायचं आणि दुसरीकडे शिवसेनेशी हा माणूस गद्दारी करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी यावेळी केला. भाजप प्रवेशासाठी सूर्यकांत दळवी मुख्यमंत्र्यांना भेटले असाही गौप्यस्फोट करत लाज वाटली पाहिजे, या माणसाला जनाची नाही तर मनाची अशी टीका रामदास कदम यांनी यावेळी केली.
या मेळाव्यात रामदास कदम यांनी नारायण राणेंवर शाब्दिक हल्लाबोल केला. काँग्रेसचे तळवे चाटून झाले. त्यानंतर भाजप झालं. आता आठवलेंचा पक्ष बाकी आहे. ज्या शिवसेनेच्या जीवावर नारायण राणे यांनी हे वैभव कमावलं त्या राणेंची मातोश्रीवर बोलण्याची औकतं आहे का अशी टीका कदम यांनी यावेळी केली. तसेच नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे. हा डाग रामदास कदम धुतल्याशिवाय राहणार नाही अशीही जहरी टीका रामदास कदम यांनी यावेळी केली.