रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी देशहिताच्या दृष्टीकोनातून आखलेल्या नव्या धोरणांमुळे अनेकांची झोप उडाली आहे. त्यामुळेच ही लोक मोदींच्या धोरणांना विरोध करत आहेत, अशी टीका रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यानी मोदी विरोधकांवर केली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविणार्या भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत ’चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
मागील सरकारच्या काळात म्हणजेच ५० ते ६० वर्षात मोठे उद्योजक आणि श्रीमंत व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवूनच सर्व धोरणे आखली गेली, त्याचे परिणाम आपल्याला आता भोगावे लागत आहेत, असे प्रभू म्हणाले.
देशातील गरीब, कष्टकरी वर्गाचा विकास व्हावा, यासाठीच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी धोरणे आणत आहेत. पण काही लोकांना गरिबांचा विकास नको आहे. त्यासाठी मोदींना सातत्याने विरोध केला जात आहे. याकडे प्रभू यांनी लक्ष वेधले. तेव्हा मोदींच्या धोरणांना काही व्यक्तींचा असणारा विरोध पाहता आता त्यांच्या धोरणांना देशातील नागरिकांच्या पाठिंब्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. या आधी रेल्वेचा अर्थसंकल्प फक्त ३० हजार कोटींपुरता मर्यादीत होता. तो आता साडेतीन लाख कोटींपर्यंत नेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.