मुंबई : नवीन रोजगार आणि उद्योग निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत सीआयआय उत्पादन शिखर परिषद 2017 मध्ये बोलत होते.
ते म्हणाले की सरकार आणि उद्योग क्षेत्राचे प्राधान्यक्रम समान असून उद्यमशीलतेला प्रोत्साहन द्यायला हवे. अन्नप्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देईल तसेच उद्योग कॉरिडॉरही विकसित करेल असे ते म्हणाले. निर्मितीला प्रोत्साहन द्यायला हवे असं त्यांनी सांगितलं.
मेक इन इंडिया अभियानाबाबत ते म्हणाले की परिवर्तनाद्वारे भारत निर्माण म्हणजे मेक इन इंडिया आहे. इलेक्ट्रीक वस्तूंचा भारत सर्वात मोठा आयातदार असून या क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण व्हायला हवे असे ते म्हणाले.
उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक लोकांना सामील करून घ्यायला हवे यावर त्यांनी भर दिला.
लघु उद्योगांप्रति आपण आपला दृष्टीकोन बदलायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांचे संशोधन आणि विकासातील योगदान अभूतपूर्व आहे. व्यवसाय सुलभतेला सरकार प्रोत्साहन देत असून जागतिक दर्जाचे उद्योग उभारणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.