
नवी दिल्ली : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत एअर सेवा 2.0 या वेब पोर्टलच्या आधुनिक आवृत्तीचे आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन झाले.
हवाई वाहतुकीच्या सर्व सुविधांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पोर्टल आणि ॲप अत्याधुनिक करण्यात आले आहे अशी माहिती सुरेश प्रभू यांनी दिली. नव्या आवृत्तीत प्रवाशांना पोर्टलवर नोंदणी करताना सोशल मिडिया आणि चार्ट बोर्ड यावरही संलग्न होता येईल. त्याशिवाय प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुधारित यंत्रणा विमानाच्या वेळा, वेळापत्रक यांची अद्ययावत माहिती प्रवाशांना मिळू शकेल. या ॲपमुळे प्रवाशांना विनासायस विमानसेवा करता येईल.
विमानसेवेच्या दर्जात सुधारणा करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
सध्या भारतात दरवर्षी सरासरी पाच कोटी प्रवासी हवाई मार्गे प्रवास करत असून ही संख्या भविष्यात वाढणार आहे. यामुळे एअर सेवा ॲप अत्याधुनिक करुन प्रवाशांच्या सेवेत सुधारणा करण्याची गरज होती अशी माहिती जयंत सिन्हा यांनी यावेळी दिली.
या पहिल्या ॲपचे उद्घाटन नोव्हेंबर 2016 मध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमात एक वर्षात प्रवाशांच्या तक्रारींचे तत्परतेने निवारण केल्याबद्दल चेन्नई विमानतळाला चॅम्पियन पुरस्काराने गौरवण्यात आले.
















