
ठाणे : सी. के. पी. सोशल क्लब व सी. के. पी. ज्ञातीगृह, ठाणे यांच्या संयुक्त विद्दमाने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने कै सुरेश गुप्ते स्मृती महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०१९-२० चे आयोजन १० ते १२ ऑगस्ट २०१९ दरम्यान सी. के.पी. सभागृह, खारकर आळी, ठाणे ( पश्चिम ) येथे करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या आठ विजेत्यांना मिळून एकंदर १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असून दोनही गटांतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना कै सुरेश गुप्ते स्मृती चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे तात्काळ निकाल www.maharashtracarromassociation.com या राज्य संघटनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार असून पुरुष व महिला एकेरीचा अंतिम सामना शिवाय पुरुष एकेरीचे उपांत्य फेरी, उपउपांत्य फेरी व अन्य महत्वाच्या लढतींचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून प्रक्षेपित केले जाणार आहे. स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतर राष्ट्रीय पंच रमेश चव्हाण ( ठाणे ) हे काम करणार असून सहाय्यक प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच आनंद वैद्य ( मुंबई ) यांची नियुक्ती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केली आहे.
महाराष्ट्राच्या ११ जिल्ह्यांतून पुरुष एकेरी गटात एकंदर ३३६ तर महिला एकेरी गटात एकंदर ६४ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. आजी माजी विश्व् विजेते योगेश परदेशी ( पुणे ) व प्रशांत मोरे ( मुंबई ) यांच्याव्यतिरिक्त अभिजीत त्रीपनकर, अनिल मुंढे, रहीम खान ( सर्व पुणे ), अभिषेक चव्हाण ( रत्नागिरी ), संदीप देवरुखकर, संदीप दिवे, फहीम काझी, झैद अहमद, संजय मांडे, पंकज पवार, योगेश धोंगडे व महिलांमध्ये ऐशा महम्मद, मैत्रेयी गोगटे, संगीता चांदोरकर, अनुपमा केदार, शिल्पा पळणीटकर, नीलम घोडके ( सर्व मुंबई ) सारख्या दिग्गज खेळाडूंचा कस या स्पर्धेत लागणार आहे.
स्पर्धेतील मानांकने पुढीलप्रमाणे.
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे ( मुंबई ), २) संदीप देवरुखकर ( मुंबई ), ३) राजेश गोहिल ( ठाणे ), ४) संदीप दिवे ( मुंबई ), ५) योगेश धोंगडे ( मुंबई ) ६) योगेश परदेशी ( पुणे ), ७) अनिल मुंढे ( पुणे ), ८) अभिषेक चव्हाण ( रत्नागिरी )
महिला एकेरी : १) काजल कुमारी ( मुंबई ), २) निलम घोडके ( मुंबई ), ३) ऐशा खोकावाला ( मुंबई ), ४) मैत्रेयी गोगटे ( रत्नागिरी ), ५) संगीता चांदोरकर ( मुंबई ), ६) पुष्कर्णी भट्टड ( पुणे ), ७) मिताली पिंपळे ( मुंबई ), ८) मीनल लेले – खरे ( ठाणे )















