रत्नागिरी (आरकेजी) : सरकारमध्ये सत्तेत असलेली शिवसेना एवढी दुर्लक्षित आहे की, लाभार्थीच्या जाहिरातीतून ही त्यांना वगळण्यात आले आहे, अशी खरमखरीत टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेवर केली. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे त्या बोलत होत्या. सुळे आजपासून रत्नागिरीत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. शरदचंद्रजी पवार कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय खरवते येथील जागतिक अन्नदिन कार्यक्रमाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या सरकारमधील भूमिकेबाबत त्यांनी शिवसेनेवर जोरदार तोंडसुख घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवादही साधला.
भाजप- शिवसेना जरी सत्तेत असली तरी त्यांच्यातील राजकीय वैर आख्या महाराष्ट्राला परिचित आहे. शिवसेना सत्ता सोडण्याची धमकीही देत असते. याबाबत रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका आहे. शिवसेना हि कन्फ्युज पार्टी आहे. शिवसेनेचे दोन्ही दगडावर पाय आहेत. एकीकडे सत्तेमधील सर्व लाभ सोई घ्यायच्या आणि दुसरीकडे विरोधकाची भूमिका बजवायची. त्यामुळे शिवसेनेने ठरवलं पाहिजे सत्तेत रहावं कि विरोधात. पण हिम्मत असेल तर शिवसेनेने सत्ता सोडावी आणि सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरावं अशी टीका यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेवर केली. दरम्यान शिवसेना 50 टक्के सत्तेत आहे. पण शिवसेनेला काडीचीही किंमत नाहीय, त्यामुळेच लाभार्थीच्या जाहिरातीतही ते नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
गुजरातमध्ये अतिशय खालच्या पातळीवर राजकारण – सुप्रिया सुळे
सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या कथित सेक्स सिडीनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे गुजरातचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. याबाबत रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारलं असता गुजरातमध्ये अतिशय खालच्या पातळीवर राजकारण सुरु झालं असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाही असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. त्या सावर्डेत पत्रकारांशी बोलत होत्या.