
मुंबई : दिनांक १६ मे रोजी, ओला वाकोला हॉल, सांताक्रूझ पूर्व येथे, इंडीया गठबंधन महाविकास आघाडीच्या मुंबईतील उमेदवारांच्या समर्थनार्थ, विद्यापीठातील तसेच इतर कॉलेजेस चे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण हकक कायद्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांतर्फे सभा आयोजित करण्यात आली होती.
सभेला, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते, माजी राज्यसभा सदस्य, हुसेन दलवाई प्रमुख पाहुणे होते तर शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील अध्यक्षस्थानी होते. सुरुवातीला ज्येष्ठ शिक्षक नेत्या डॉ.तापती मुखोपाध्याय यांनी प्रास्ताविक केले आणि महविकास आघाडीला शिक्षकांतर्फे पाठिंबा देण्यामागील भूमिका विषद केली. यावेळी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेते आर बी सिंग, शिक्षक भारतीचे नेते सुभाष मोरे, तसेच प्रकाश सोनावणे, कॉ. शैलेंद्र कांबळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
काँग्रेस चे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी श्रोत्यांना, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार जागरूकतेने वापरून सध्याच्या मोदी सरकारला हरवण्याचे आवाहन केले. आरक्षण काँग्रेसने आणले आणि तेच संपवण्यासाठी, संविधान बदलण्यासाठी आणि आर एस एस ची मनुस्मृती आणण्यासाठी मोदी सरकारला बहुमत हवे आहे ही खेळी सर्वांनी समजून घेतली पाहिजे हेसुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले.
इंडिया आघाडीचे, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी सर्वप्रथम आयोजकांचे आणि जमलेल्या श्रोत्यांचे पाठिंब्याबद्दल आभार मानले. सत्ताधारी भेदभावाचे राजकारण करत आहेत तरी देशाला हुकूमशाही पासून वाचवायचे असेल तर मुंबईच्या जनतेला जागरूक करण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
प्रकाश सोनावणे यांनी वर्षा गायकवाड यांच्या शिक्षणमंत्री म्हणून केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि जमलेल्या श्रोत्यांना मतदानाचे आवाहन केले.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नेते आर बी सिंग यांनी उपस्थित नेत्यांना सत्तेत आल्यावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी केली.
शिक्षक संघटनेचे नेते सुभाष मोरे यांनी सद्य परिस्थितीत शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यांचा आढावा घेतला. तसेच नोकरभरती, पेन्शन, पुरेसे वेतन , जुनी पेन्शन, आणि के जी टू पी जी अनुदानीत शिक्षण देण्याची मागणी केली.
आमदार कपिल पाटील यांनी इंडिया आघाडीच्या उपस्थित नेत्यांना, महाविकास आघाडीच्या सोबत असण्याचे आश्वासन दिले तसेच सत्तेत आल्यावर शिक्षणाचे खाजगीकरण, कंत्राटीकरण संपवण्याचे आवाहन केले.
यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तर्फे डॉ. तापती मुखोपाध्याय यांच्या हस्ते शिक्षण व्यवस्थेसंदर्भातील मागण्यांचे एक निवेदन उपस्थित इंडिया आघाडीच्या नेत्यांना देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अखेरीस ज्येष्ठ शिक्षक नेत्या डॉ मधू परांजपे यांनी सर्वांचे आभार मानले. इंडीया गठबंधन-महाविकास आघाडीला भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करून सभा संपली.















