ठाणे : देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी (एमएसएमई) केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आज ठाण्यातल्या डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात सपोर्ट आणि आऊटरीच उपक्रमाचा प्रारंभ झाला. देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या अडथळ्यांच्या निराकरणासाठी धोरण जाहीर करण्याची नितांत गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या क्षेत्रासाठी अनेक ऐतिहासिक घोषणा केल्या असून त्या निव्वळ घोषणाच राहणार नाहीत असं प्रभू यांनी सांगितले. आगामी 100 दिवसात या घोषणांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर पंतप्रधान स्वत: लक्ष ठेऊन असतील असेही प्रभू म्हणाले.
या महत्त्वाच्या संधीचा देशातल्या तरुण उद्योजकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि उद्योग क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन प्रभू यांनी केले. मराठी माणसासाठी दिवाळी पहाट महत्त्वाची असते मात्र आज पंतप्रधानांनी एमएसएमई क्षेत्रासाठी केलेल्या घोषणा ही नवी पहाटच आहे,असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे या कार्यक्रमाच्या प्रारंभाचा मुख्य समारंभ झाला. यावेळी केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली तसेच केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागाचे राज्यमंत्री गिरीराज सिंग उपस्थित होते.
एमएसएमई क्षेत्राला अर्थसहाय्यासाठी सुलभता, बाजारपेठेची उपलब्धता, सहाय्य सुलभीकरणसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.
एमएसएमई उद्योगांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम 100 दिवस सुरू राहणार असून देशभरातल्या 100 जिल्ह्यात तो राबवला जाणार आहे.