मुंबई, (निसार अली) : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर ठसा उमटविणारा बालकलाकार सनी पवार याचा सत्कार केंद्रिय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. सनीसह आजोबा भीमा पवार त्याची आई, मामा आदींनी आठवले यांची त्यांच्या वांद्रे संविधान निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सनीला तथागत बुद्धांची मूर्ती आणि रिपाइंकडून २५ हजार रुपये प्रदान करण्यात आले.
लायन या हॉलिवूडपटातून जगभरात पोहोचलेल्या सनीचा रिपब्लिकन पक्षातर्फे मुंबईत जाहीर सत्कार सोहळा लवकरच करू, तसेच त्याच्या वडिलांची पालिकेतील कंत्राटी कामगार म्हणून गेलेली नोकरी पुन्हा मिळवून देऊ, असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिले.
कुमार जीत आठवले, सीमाताई आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तानसेन ननावरे, जिल्हा अध्यक्ष विवेक पवार, शिलाताई गांगुर्डे , श्रीकांत भालेराव, सिद्धार्थ कासारे, हेमंत रणपिसे, सचिनभाई मोहिते, भगवान सावंत आदी यावेळी उपस्थित होते