रत्नागिरी, (आरकेजी) : देशातील सर्व पेट्रोल पंप साप्ताहिक सुट्टी घेणार आहेत. त्यानुसार १४ मे पासुन दर रविवारी पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. फामपेडा (फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) संलग्न असलेल्या CIPD (Consortium of Indian Petroleum Dealers) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक कुरुक्षेत्र, हरयाणा येथे नुकतीच झाली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत आणखीही काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याचं फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘मन कि बात’ या कार्यक्रमात देशातील १२५ करोड भारतीयानी आठवड्यातील एक दिवस पेट्रोल- डीझेलचा वापर टाळुन आयात कमी करावी आणि प्रदुषण कमी करुन हरीत पर्यावरण जोपासण्यास आणि नव भारत घडविण्यास मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पेट्रोल पंप व्यवसायातील प्रस्तावित बदलाची नोंद घेणें, सर्व स्टाफला प्रशिक्षित करणे, ग्राहकाना माहीती देणे आदी कामानिमित्त बुधवारी १० मे रोजी एक दिवस खरेदी बंद ठेवण्यात येणार आहे. डीलर मार्जिनचा मुद्दा सुटेपर्यंत मनुष्यबळ, विज खर्च व इतर खर्चामध्ये बचत करण्यासाठी सोमवार १५ मे पासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत फक्त एकाच शिफ्ट मध्ये कामकाज करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला, अशी माहिती लोध यांनी दिली.