रत्नागिरी : आपल्या देशातील संस्कृती व परंपरा सातासमुद्रापार न्यायच्या असतील तर आपल्याला स्वत:ला उत्तम इंग्रजी येणे आवश्यक आहे. जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषा सर्वाधिक देशात बोलली जाते. तसेच जगातील सर्वाधिक पुस्तके ही इंग्रजी भाषेमध्ये छापली जातात. सर्वाधिक ज्ञानी होण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविले पाहिजे. इंग्रजी भाषा येणे ही आता काळाची गरज आहे असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.
श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या बाबूराव जोशी गुरुकूल प्रकल्प रत्नागिरी या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी महाजन बोलत होत्या. १ मे रोजी हा कार्यक्रमा झाला.
देशाचे भविष्य हे लहान मूल आहेत. त्यांना चांगले ज्ञान व चांगले संस्कार मिळण्यासाठी गुरुकूलसारख्या संस्था प्रयत्नशील असतात अशा संस्थांना समाजामधून प्रोत्साहन मिळावे व अशा संस्थेतून चांगले नागरिक घडवावेत. या हेतूने जागतिक भाषेच्या माध्यमाच्या शिक्षणाचा पालकांनी प्राधान्य देवून आपल्या पाल्यांच्या ज्ञानामध्ये भर घालावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतिश शेवडे, सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.