रत्नागिरी : आणीबाणीत जे झालं ते चुकीचंच, आणीबाणी वेळी साधीसाधी माणस, चांगली काम करणारी माणसे तुरुंगात डांबली गेली, हे चुकीचं झालं, अशी भावना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रविवारी चिपळूण येथील शिरळ इथल्या विद्याभारती भारतीय शिक्षा संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केली..
चिपळूण येथील शिरळ हे लोकसभा अध्यक्ष असलेल्या सुमित्राताई महाजन यांचं माहेर. त्यांच्या माहेरी रविवारी विद्याभारती भारतीय शिक्षण संकुलाचं भूमिपूजन सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी आणीबाणीतल्या घटनांना उजाळा देत, आपल्याला राजकारणात का यावं लागलं याचं गुपित सांगितलं. ज्यावेळी देशावर एक कठीण प्रसंग आला. आणीबाणी लागली. आताच्या नवीन मुलांना ते माहीतही नसेल, इतकी ती जुनी झाली आहे. आणीबाणीत जे झालं ते चुकीचंच, साधीसाधी माणसं, चांगलं काम करणाऱ्या माणसांना पकडून तुरुंगात टाकण्यात आलं. यावेळी सर्वाधिक घाला घालण्यात आला तो चांगल्या संस्कार देणाऱ्या संस्थांवर.अशा संस्था बंद करण्यात आल्या. आणि यांच्यावर घाला का यावा हे मला अजूनही कळलेलं नाही, असं म्हणत त्यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. पहिल्यांदा मी राजकारणात नव्हते, पण आणीबाणीत जे अन्यायकारक पाहिलं ते चुकीचंच वाटतं. जर चुकीचं गोष्ट आपल्याला ठीक करायची असेल तर आपल्याला मैदानात उतरावं लागेल, राजकारण वाईट झालं आहे असं म्हणून आपल्याला लांब राहून चालणार नाही, कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते ठीक करायला आपल्याला त्या मैदानात उतरनं आवश्यक आहे. म्हणून मी राजकारणात आले असं गुपित सुमित्रा महाजन यांनी यावेळी उघड केलं..