नवी दिल्ली : प्राध्यापक सुखदेव थोरात यांना आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वर्ष २०११ चा ‘डॉ. आंबडेकर राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.‘केलेल्या कामाचे उचित मुल्याकंन झाले असून पुरस्काराने समाधानी असल्याची भावना प्रा. थोरात यांनी व्यक्त केली’.
विज्ञान भवन येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रपतीच्या हस्ते ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ वितरीत करण्यात आले. या सोहळ्यात वर्ष २०११ , वर्ष २०१२ तसेच वर्ष २०१४ साठी देशभरातील तीन संस्था आणि एका व्यक्तीला यावेळी सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप १० लाख रूपये रोख प्रशस्तीपत्र असे आहे.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री विजय सांपला, रामदास आठवले, कृष्णपाल, डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दारा संभय्या, सचिव जी. लथा कृष्णराव मंचावर उपस्थित होत्या. यावेळी प्रा. सुखदेव थोरात यांना वर्ष २०११ चा डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. सुखदेव थोरात हे मुळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे आहेत. त्यांनी अर्थशास्त्र विषयात दिल्लीतील जवाहर लाल नेहरू विद्यापीठातून पीएच.डी. केली. १९८९ ते १९९१ पर्यंत आईओवा स्टेट विद्यापीठ, युएसमध्ये प्रा. थोरात अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. यासह इंटरनेशनल फुड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट, वाशिंगटनमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत होते. 2006 ते 2011 दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
प्रा. थोरात यांना २००८ मध्ये भारत सरकारने पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केले. सध्या ते भारतीय समाज विज्ञान संशोधन परिषद (आईसीएसएसआर) चे अध्यक्ष आहेत. यासह जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत.
प्रा. थोरात यांचा जाती प्रथा, जातीय भेदभाव, अर्थव्यवस्था आणि गरिबी या विषयाचे विश्लेषक आहेत. यासह डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांचे गाडे अभ्यासक आहेत. प्रा. थोरात यांनी आतापर्यंत २१ पेक्षा अधिक शैक्षणिक पुस्तके लिहिलेली आहेत. यासह त्यांचे १०० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत.