मुंबई, (भूषण भिसे) : विक्रोळीतील उद्योन्मुख डान्सर संजोत घाग(27) याने गुरुवारी रात्री आत्महत्या केली. घरात कोणी नसताना त्याने स्वत:चे जीवन संपविले. कन्नमवार नगरातील इमारत क्रमांक 88 येथे गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रात्री 8 च्या सुमारास त्याचे कुटुंबिय घरी आले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. तो दरवाजा का उघडत नाही, यासाठी खिडकीतून पाहिले असता संजोत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.
दरवाजा तोडून त्याला तातडीने पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात नेण्यात आले. त्याआधीच तो मरण पावला होता. ही बातमी पसरताच रुग्णालयाजवळ नागरिकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. नगरसेवक उपेंद्र सावंत यांनीही रुग्णालयात धाव घेतली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही, तपास सुरू आहे असे विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.
संजोत विक्रोळी परिसरात डान्सर म्हणून प्रसिद्ध होता. खासगी दूरचित्रवाहिनीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या डान्स शो मध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या ग्रुपने सहभाग घेतला होता. मनमिळाऊ असलेल्या संजोतने टोकाचे पाऊल का उचलले हेच समजले नाही, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.