मुंबई : सिंधुदूर्ग, चंद्रपूर हे दोन जिल्हे हेल्थ केअरमध्ये मॉडेल जिल्हे बनवा, त्यासाठी या दोन जिल्ह्यांच्या गरजा, तेथील मनुष्यबळ, सध्या असलेल्या पायाभूत सुविधा आणि सेवा याचा सखोल अभ्यास करा, भविष्यातील गरजा लक्षात घ्या आणि त्याचे एक उत्तम डिझाईन तयार करा, अशा सूचना वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.सह्याद्री अतिथीगृहात यासंबंधी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
सिंधुदूर्ग आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचा पथदर्शी स्वरूपात चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत विकास करण्यात येत असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, या दोन जिल्ह्यांचे एकात्मिक विकास मॉडेल यशस्वी झाले की त्या त्या जिल्ह्यांची वैशिष्ट्ये आणि गरजा लक्षात घेऊन हे आराखडे राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविले जातील.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, चांदा ते बांदा योजना, मानव विकास मिशन, मायनिंग डेव्हलपमेंट फंड यामधून निधी उपलब्ध करून देता येऊ शकेल. यातील काही कामांचे प्रस्ताव ज्यांना केंद्र शासनाकडून निधी मिळू शकतो ते तयार करून केंद्र शासनाकडे पाठवावेत, असेही ते यावेळी म्हणाले.
या दोन जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता, वीजपुरवठा यासारख्या सेवांचा दर्जा उत्तम राहील याचा विचार प्रकल्प अहवाल तयार करताना केला जावा. प्रकल्पातील सर्व कामांचा दर्जा उत्तम राहील, कामे कालबद्धरितीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे तसेच या कामांचे दायित्व ही निश्चित केले जावे असेही ते यावेळी म्हणाले.
बैठकीत देशात केरळचे मॉडेल आरोग्य क्षेत्रात सर्वात चांगले असल्याची माहिती आरोग्य संचालकांनी दिली. ते म्हणाले, यात १० इंडिकेटर्सवर सुंदर काम झाले असून त्यांचा चंद्रपूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याना मॉडेल हेल्थ केअर सिटी बनवताना विचार करता येऊ शकेल.
बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, वित्त विभागाचे प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) आर. ए. राजीव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त सार्वजनिक आरोग्य राजीवकुमार, संचालक आरोग्य डॉ. सतीश पवार, चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.