उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा आज गोरेगाव येथील नेस्को संकुलात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री दीपक केसरकर, दादा भुसे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, लीलाधर डाके, गजानन कीर्तिकर, जपानचे कौन्सिल जनरल डॉ. मुरुग्ण मुरहार, युगंडाचे कौन्सिल जनरल मधुसूदन अग्रवाल, श्रीमती रश्मी ठाकरे, श्रीमती सुषमा देसाई यांच्यासह मंत्री मंडळातील सदस्य उपस्थित होते. शिवसेना, गोरेगाव विभाग व प्रबोधन संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देसाई यांच्यावरील जीवन पट तसेच पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. उद्धव ठाकरे यांनी देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
अमृतमहोत्सवानिमित्त अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, ७५ व्या वर्षीही सुभाष देसाई यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे. गेल्या तीन वर्षात परदेशात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी मी व सुभाष जी जात होतो तेव्हा त्यांचा उत्साह मी पाहिला आहे. प्रत्येक परिषद अथवा बैठकांना ते न थकता सहभागी होत असत. श्रमाने, अनुभवाने आपल्या ताकदीवर उभे राहिलेले जीवन त्यांनी आपल्या पुस्तकातून मांडले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे अनुयायी म्हणून ते आजही शिवसेनेचे काम करत आहेत. लोकसंग्रह हाच त्यांनी आपली संपत्ती मानली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील बारकावे आणि उद्धव ठाकरे यांनी पक्षाला दिलेले नवे आयाम याचे चित्रण त्यांनी पुस्तकात मांडले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे. त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नीचे मोलाची साथ लाभली आहे.
राज्यात उद्योग आणण्यासाठी त्यांनी खूप काम केले आहे. मेक इन इंडियाचे उत्तम नियोजन त्यांनी केले होते. त्यामुळे गेल्या 2 वर्षात देशातील सर्वाधिक परकीय थेट गुंतवणूक राज्यात झाली आहे. २ लाख २० हजार कोटी पैकी निम्मी गुंतवणूक राज्यात झाली आहे. यामुळे राज्याने उद्योगात अढळस्थान मिळवले आहे. या कामात देसाई यांचा मोलाचा वाटा आहे. उद्योगमंत्री म्हणून त्यांनी नियोजन बद्ध काम केले आहे. उद्योजकांच्या अडचणी समजावून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मंत्रिमंडळात अनुभवी सहकारी म्हणून ते काम करत आहेत. राज्य चालवताना येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे काम देसाई करत आहेत. खऱ्या अर्थाने ते आमचे संकटमोचक आहेत. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
ठाकरे यांनी देसाई यांच्याबरोबर केलेल्या कामांना व आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, देसाई यांच्या सारख्या सहकार्यामुळे पक्ष मजबूत उभा आहे. त्याचे आशिर्वाद हेच आमचे बळ आहे.
देसाई म्हणाले की माझ्या आठवणी मांडण्याचा प्रयत्न पुस्तकात केला आहे. मी कुणीही नव्हतो. पण आज पुस्तक लिहिण्या इतपत कुणीतरी आहे हे केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. मंत्रीमंडळात काम करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दाखवला आणि काम करण्याची संधी दिली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री म्हणून काम करण्यासारखा आनंद नाही. त्यासाठी मी मंत्री पदाची जबाबदारी घेतली. त्यांच्याबरोबर काम करण्याचा समृद्ध अनुभव मिळाला आहे.
राहुल बजाज यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रसिद्ध वादक शिवमणी यांच्या संगीताचा कार्यक्रम झाला.