मुंबई: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असणाऱ्या प्रसिद्ध सिनेविस्ता स्टुडिओ आज आगीत भस्मसात झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शनिवारी ता. (6) संध्याकाळी आठच्या सुमारास अचानक ही आग लागली आहे. माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 9 वाजून 40 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मागील काही वर्षांपासून सिनेविस्टा नावाचा स्टुडिओ सिनेमा आणि दूरचित्रवाणी मालिका यांच्या शूटिंग साठी नावारुपाला आला होता. आगीत स्टुडिओचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
आग लागली तेव्हा स्टुडिओत अंजली, एक दिवाना था, बेपनाह, हासिल या चार मालिकेचे शूटिंग सुरू होतं. पहिली आग बेपनाह या मालिकेच्या सेटला लागली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. ही घटना घडली त्यावेळी सेटवर दीडशे ते दोनशे कलाकार आणि तंत्रज्ञ होते.