: हिमालय पूल दुर्घटनेत सहा जणांचा बळी तर ३१ जण जखमी झाल्यानंतर जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने मुंबईतील पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पुलांचा अहवाल महिनाभरात सादर करावा, असे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
चूकीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमुळे हिमालय पुल दुर्घटना घडली. आयक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी नुसार सीएसएमटी येथील पुलाचे ऑडिट करणाऱ्या कंपनीवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दुर्घटनेनंतर मुंबईकरांनी महापालिकेवर रोष व्यक्त केला. या दुर्घटनेतून धडा घेतलेल्या महापालिकेने मुंबईच्या हद्दीमधील सर्वच पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम आणि पूर्व उपनगरातील पुलांचे ऑडिट करणाऱ्या कंपन्यांना पुन्हा नव्याने ऑडिट करण्याचे आदेश पूल विभागाने दिले आहेत. मुंबई शहरातील ३९ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट डी. डी. देसाई यांनी, पश्चिम उपनगरातील १५७ पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सि. व्ही. कांड कन्सल्टंट कंपनीने तर पूर्व उपनगरातील ६६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट कंपनीने केले होते. मात्र, देसाई या ठेकेदाराने हिमालय पूलाचा अहवाल बोगस दिल्याप्रकरणी कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. या ठिकाणी लवकरच नव्याने कन्सलटंट नियुक्त केला जाणार. या दरम्यान पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पुलांचे ऑडिट महिनाभरात करून सादर करण्याचे आदेश पालिकेच्या पूल विभागाने सि. व्ही. कांड कन्सल्टंट व स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट या कंपन्यांना दिले आहेत.















