Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ या वर्षाकरिता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज (सोमवार, दिनांक ५ एप्रिल २०२१) झालेल्या निवडणुकीत श्री. यशवंत जाधव (शिवसेना) हे १४ मते मिळवून सलग चौथ्यांदा विजयी झाले. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीमती राजेश्री राजेश शिरवडकर (भारतीय जनता पक्ष) यांना ०८ मते मिळाली.
स्थायी समितीच्या एकूण २७ सदस्यांपैकी २२ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. या निवडणुकीत ०३ सदस्य मतदानप्रसंगी तटस्थ राहिले. एक सदस्य अनुपस्थित होते. दरम्यान, या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत श्री. आसिफ झकारिया (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
तत्पूर्वी, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी आज (सोमवार, दिनांक ५ एप्रिल २०२१) झालेल्या निवडणुकीत श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) (शिवसेना) ह्या १३ मते मिळवून निवडून आल्या. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्री. पंकज यादव (भारतीय जनता पक्ष) यांना ०९ मते मिळाली. ०४ सदस्य तटस्थ राहिले. तत्पूर्वी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत श्रीमती आशा सुरेश कोपरकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
दोन्ही निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांनी कामकाज पाहिले.
श्री. यशवंत जाधव यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आणि श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांच्यासह सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते श्री. रवी राजा, भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्री. प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेता श्रीमती राखी जाधव, समाजवादी पार्टीचे गटनेते व आमदार श्री. रईस शेख तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, सह आयुक्त श्री. आशुतोष सलील तसेच विविध नगरसेवक व नगरसेविका आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन निर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.
महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका सभागृहात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन करुन या दोन्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आल्या.