चेन्नई / मुंबई, जुलै 29, 2021 – एप्रिल 2021च्या सुरुवातीच्या काळात रोलॅंड बुशाहा यांना भारतात ‘स्टेलॅन्टिस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक म्हणून घोषित केल्यानंतर, कंपनीने आज आपल्या कामकाजासाठी प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या आहेत.
सौरभ वत्स आणि निपुण जे महाजन यांच्याकडे आता अनुक्रमे भारतातील सिट्रोएन ब्रँड आणि जीप ब्रँड यांची जबाबदारी आली आहे.
आपल्या नव्या भूमिकेत, सौरभ यांच्याकडे भारतातील सिट्रोएनची विक्री, विपणन, विक्रीपश्चात सेवा, उत्पादन नियोजन आणि जनसंपर्क या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. 25 वर्षांचा अनुभव असलेले, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, सौरभ हे 2018 मध्ये पीएसएमध्ये मार्केटिंग व कम्युनिकेशन्स या विभागांचे वरिष्ठ संचालक म्हणून रुजू झाले. ‘सिट्रोएन ब्रँड’ आणि ‘सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ भारतात सादर करण्यासाठीची अनोखी रणनीती आखण्यात व अंमलात आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
जीप या ब्रँडची भारतातील विक्री, विपणन, विक्रीपश्चात सेवा, उत्पादन नियोजन व जनसंपर्क या कामांसाठी निपुण यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. निपुण यांना वाहन उद्योगात 25 वर्षांचा अनुभव आहे. गेली 5 वर्षे ते जीप ब्रँडसाठी उपाध्यक्ष (सेल्स ऑपरेशन्स व नेटवर्क डेव्हलपमेंट) या पदावरून काम करीत आहेत. भारतात ‘जीप’ हा ब्रँड सादर करण्यात आणि ‘जीप कंपास’ या मॉडेलसाठी 50 हजारांचा विक्रीचा टप्पा गाठण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
भारतातील ‘स्टेलॅन्टिस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक रोलँड बुशाहा यांच्या थेट हाताखाली सौरभ आणि निपुण काम करतील. ही नवीन, एकात्मिक संरचना 7 जून 2021 पासून लागू झाली आहे.
“सौरभ आणि निपुण यांचे आमच्या नेतृत्व संघात स्वागत करण्यात मला आनंद आहे. ‘स्टेलॅन्टिस’च्या जन्मापासून एक अखंड एकीकरण प्रक्रिया सुरू झाली, ती या नेमणुकांमधून उत्तम पद्धतीने सुरू राहिली आहे,” असे भारतातील ‘स्टेलॅन्टिस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक रोलँड बुशाहा यांनी नमूद केले. “सौरभ व निपुण हे दोघेही उत्कृष्ट कामगिरी आणि उद्योगातील समृद्ध अनुभवांची मालिका घेऊन येत आहेत. त्यातून आमच्या ग्राहकांना, भागीदारांना आणि संपूर्ण समुहाला मोठा फायदा होईल,” असेही बुशाहा यांनी म्हटले.
‘स्टेलॅन्टिस’विषयी :
स्टेलॅन्टिस ही जगातील एक आघाडीची वाहन उत्पादक आणि मोबिलिटी पुरविणारी कंपनी आहे. विशिष्ट, परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह मोबिलिटी सोल्यूशन्सच्या माध्यमातून ती प्रवासाचे स्वातंत्र्य देऊ करते. या समुहाचा समृद्ध वारसा आणि व्यापक भौगोलिक उपस्थिती यांव्यतिरिक्त, चिरंतन कामगिरी, अनुभवाची खोली आणि जगभरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विविधांगी प्रतिभा ही या कंपनीची सर्वात मोठी ताकद आहे. ‘स्टेलॅन्टिस’च्या विस्तृत आणि आयकॉनिक ब्रँडच्या पोर्टफोलिओचा लाभ ही कंपनी सर्वांना मिळवून देईल. कंपनीच्या द्रष्ट्या संस्थापकांनी मोठ्या उत्कटतेने व स्पर्धात्मक भावनेने विशिष्ट दर्जाच्या वाहनांची निर्मिती करून हा ब्रॅंड नावारुपास आणला आहे. या भावनेशी कंपनीचे कर्मचारी व ग्राहक एकरूप होत असतात. “आपण श्रेष्ठ बनायचे, मोठे नव्हे,” अशी ‘स्टेलॅन्टिस’ची आकांक्षा आहे. त्यातूनच ती आपल्या सर्व भागधारकांसाठी, तसेच ज्या समुदायात ती कार्यरत आहे, तिच्यासाठी जोडले जाणारे मूल्य तयार करीत असते.