मुंबई : मुंबई महापालिकेची आर्थिक किल्ली अशी ओळख असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी रमेश कोरगांवकर यांनी तर शुभदा गुडेकर यांनी शिक्षण समितीसाठी आज अर्ज भरला आहे. त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने अर्ज न भरल्याने या निवडणुका बिनविरोध होणार आहेत. १४ मार्चच्या समितीच्या सभेत या दोघांच्याही नावांची अधिकृतरित्या घोषणा केली जाईल.
दरम्यान, मंगेश सातमकर यांच्या गळ्यात स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता होती. परंतु, शुक्रवारी अर्ज भरण्यापूर्वी अचानक मातोश्रीवरुन कोरगांवकर यांच्या नावाचे आदेश आले. यामुळे सातमकर कमालीचे नाराज झाले आहेत.
शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी अनुभवी नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या शुभदा गुडेकर यांची बिनविरोध निवड होणार आहे. त्यांनी आरोग्य समिती अध्यक्षपदाचीही धुरा सांभाळली आहे. स्थायी समितीत व शिक्षण समितीवर प्रत्येकी २६ सदस्य व अध्यक्ष, पदसिध्द सदस्य म्हणून असणार आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शीतल म्हात्रे व शुभदा गुडेकर इच्छुक होत्या. मात्र गुडेकर यांच्या नावाचा आदेश आल्याने शीतल म्हात्रे यांचे नाव मागे पडले.
सातमकर नाराज
महापौर, सभागृह नेता या पदावर मंगेश सातामकर यांची वर्णी न लागल्याने सातमकर यांची स्थायी समिती अध्यक्ष पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता होती. सातमकर यांनाच स्थायी समिती अध्यक्ष पद मिळेल, अशी शाश्वती असल्याने ते सकाळपासून पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात उपस्थित होते. परंतु पक्ष प्रमुखांकडून आलेल्या आदेशानंतर त्यांच्याऐवजी भांडुप येथून सलग चार वेळा नगरसेवक असलेले रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या सातमकर यांनी महापालिका मुख्यालयातून निघून जाणे पसंत केले. २००७ मध्ये ही झालेल्या निवडणुकीच्यावेळीही त्यांचे नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चर्चेत होते.