मुंबई, दि. 21 (प्रतिनिधी) – मुंबई ते अमृतसर दरम्यान धावणारी पश्चिम सुपर फास्ट एक्सप्रेसला अंधेरी रेल्वे स्थानकात थांबा द्यावा व ही एक्सप्रेस वांद्रे येथून सुरु करावी अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यापुर्वी या एक्सप्रेसला अंधेरी रेल्वे स्थानकावर दोन मिनिटांचा थांबा होता. त्यामुळे उपनगरात राहणा-या प्रवाशांना त्याचा अधिक लाभ घेता येत होता.
पश्चिम सुपर फास्ट एक्सप्रेस ही एकमेव अशी गाडी आहे की ती दररोज मुंबई ते अमृतसर दरम्यान धावते. वांद्रे येथून सुरु झालेल्या या एक्सप्रेसला अंधेरी येथे दोन मिनिटांचा थांबा होता. मात्र गेल्या वर्षांपासून या एक्सप्रेसला मुंबई सेंट्रल येथून सोडण्यात येत आहे. शिवाय अंधेरी येथील थांबा काढून टाकण्यात आल्याने उपनगरात राहणा-या प्रवाशांना विशेषत: महिला, वृद्धाना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करीत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक गाठावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी मुंबई अमृतसर पश्चिम एक्सप्रेस ही वांद्रे येथून सुरु करावी व तिला अंधेरी रेल्वे स्थानकात थांबा द्यावा, अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.