‘प्रत्येक कठीण प्रसंगात, एक संधी दडलेली असते’ उक्ती सध्या सुरु असलेल्या महामारीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. भारतातील स्टार्टअप्सनी या संधीचे सोने केले. त्यांनी या महामारीचे रुपांतर संधीत केले. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. भारतीय उद्योजक, गुंतवणूकदारांनी मात्र एकत्र येऊन ते सुरु राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. सरकारी योजनांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मदत केली. ‘आत्मनिर्भर भारत’च्या बॅनरखाली स्वदेशी उत्पादनांनाही प्रोत्साहन मिळाले.
मेडिसी (MEDICI)च्या इंडिया फिनटेक रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२० पर्यंत भारतात २००० पेक्षा जास्त आघाडीचे फिनटेक स्टार्टअप उदयास आले. तसेच, डिलॉइट इंडियाच्या ‘टेक्नोलॉजी फास्ट ५०’ इंडिया २०२० अहवालात असे दिसून आले की, भारतात झपाट्याने प्रगती करणाऱ्या शीर्ष ६ कंपन्यांपैकी ४ कंपन्या फिनटेक क्षेत्रातील आहेत.
महामारीने वर्तमानातील स्टार्टअप्स आणि फिनटेक क्षेत्राला कशा प्रकारे यशाचा मार्ग दाखवला याबद्दल विस्ताराने सांगत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी श्री प्रभाकर तिवारी. भर साथीच्या उद्रेकातही स्टार्टअप्सनी नव-नवीन प्रयोग करणे थांबवले नाहीत, याची काही बोलकी उदाहरणे त्यांनी नमूद केली आहेत:
- कोव्हिड संसर्गाचा तत्काळ मागोवा घेण्यासाठी कंपन्या स्मार्ट सर्व्हायलन्स टूल्स घेऊन आल्या. भारतीय स्टार्टअप्सनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि इतर नियमावलीच्या पालनावर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट कॅमेरा, ड्रोन आणि गॉगल यासारखी साधने आणली. अशा स्थितीत गर्दीचे व्यवस्थापन करणारे सोल्युशन्स, मूव्हमेंट डिटेक्शन आणि जिओ-फेंसिंग सोल्युशन्सदेखील आले.
- कोरोना विषाणूच्या संसर्गात सॅनिटायझर हे महत्त्वाचे शस्त्र ठरले. विषाणू आणि जंतूंना दूर ठेवण्यासाठी अनेक स्टार्ट-अप्सनी निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेची साझने आणली. विषाणूचा प्रसार वाढतच असल्याने या उपायांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
- ऑनलाइन कर्ज प्रक्रियेत फिनटेक स्टार्टअप्सनी कर्जाची व्याख्याच बदलली. संधी समोर दिसत असताना, अनेक लोक आणि उद्योग साथीच्या काळातही कर्ज घेण्यास संकोच करत नाहीत. या प्रक्रियेतील ऑनलाइन उपाययोजनांमुळेच हे शक्य झाले.
- आरोग्यावरील संकटातून निर्माण झालेला आणखी एक सकारात्मक पैलू म्हणजे डिजिटल हेल्थकेअर. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डेटा अॅनलेटिक्सच्या मदतीने अनेक उद्योगांनी हेल्थकेअर सोल्युशन्स काढले. यासोबतच, होम हेल्थकेअर, ऑनलाइन फार्मासीज, विअरेबल टेक्नोलॉजी इत्यादींना प्रतिबंध, निदान, व्यवस्थापन आणि कार्यक्षमता या कारणांमुळ खूप लोकप्रियता मिळाली.
फिनटेक स्टार्टअप सर्वात आघाडीवर:
दरम्यान, फिनटेक स्टार्टअप्सनी ऑनलाइन पेमेंट संग्रह आणि मोठ्या प्रमाणात रिअल-टाइम वितरणातील मोठी दरी भरून काढली. ते क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीची सुविधा प्रदान करतात. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून तत्काळ, लवचिक आणि अडथळा-रहित लघु कर्ज प्रदान करतात. यासाठी किफायतशीर डिजिटल गहाणखतची सुविधा आहे. त्यांनी बँकांशी भागीदारी करत को-ब्रँडेड प्रीपेड क्रेडिट कार्डसह सेव्हिंग खात्यांसाठी डेबिट कार्ड्सदेखील आणली आहेत.
काही स्टार्टअप संपूर्ण संग्रहाची प्रक्रिया ऑटोमॅटिक करत आहेत. याद्वारे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, विमा प्रदाते आणि बँकांना वित्तीय सुरक्षा मिळते. कारण या संस्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. काही कंपन्या स्वत:चे ब्रँडेड बँकिंग किंवा पेमेंट प्रॉडक्ट तयार करत आहेत.
म्हणूनच, साथीच्या आजाराने देशातील फिनटेक क्षेत्राला निश्चितच गती दिली आहे. त्याला अत्यंत गरजेचा असलेला बूस्टर डोसही दिला आहे. प्रचंड आव्हाने असूनही हे क्षेत्र देशात सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र बनले. महामारीमुळे बिकट झालेल्या आर्थिक स्थितीत फिनटेक स्टार्टअपला फंडिंग मिळणार नाही, असे संकेत दिले जात असतानाच यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली.
साथीमुळे निर्माण झालेल्या न्यू-नॉर्मलमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि कॅशलेस व्यवहारांनी डिजिटल वित्तीय सेवा आणि ई-कॉमर्सला मोठा प्रतिसाद मिळाला. या आशावादी दृष्टीकोनाने, इंक४२ (Inc42) प्लस रिपोर्टनुसार, फिनटेकमधील गुंतवणूक २०२१ मध्ये २.७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.