मुंबई : महाराष्ट्रातील युवकांमध्ये मोठी क्षमता आहे. यातील नव उद्यमींना (स्टार्ट अप) जागतिक बाजारपेठेची कवाडे खुली व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांत भर म्हणून महाराष्ट्रात इनोव्हेशन हब तयार करणे महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.नव उद्यमींसाठीच्या उपक्रमशीलतेला चालना देणाऱ्या टी-हब संस्थेच्या इनोव्हेशन हब या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेबाबत राजभवन येथे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत मार्गदर्शन करताना राज्यपाल विद्यासागर राव बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नव उद्यमींच्या विकासासाठी देश आणि विदेशातील उद्यमशील उपक्रमांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. यात इनोव्हेशन हब उपयुक्त ठरेल, असे नमूद केले. त्यासाठी टी-हब आणि नॅसकॅाम या संस्थांच्या समन्वयातून एका अभ्यास गटाच्या माध्यमातून अशा विविध संधी, पर्यायांचा पडताळा घेण्यात यावा. या संकल्पनेचा परिपूर्ण अभ्यास करून, त्याबाबतचा अहवाल तयार करण्याची सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.बैठकीस अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॅा. देवानंद शिंदे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता, राज्यपालांचे सचिव वेणू गोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, रुसाच्या प्रकल्प संचालक मीना राजीव लोचन, नॅसकॅामचे संस्थापक हरिष मेहता, नॅसकॅामचे विभागीय अध्यक्ष चेतन सामंत, के. एस. विश्वनाथन यांनी सहभाग घेतला. टी-हब संकल्पनेचे संस्थापक बी. व्ही. आर. मोहन रेड्डी, टी-हबचे सीईओ जय कृष्णन, श्रीनिवास कोलीपरा यांनी इनोव्हेशन हब या संकल्पनेबाबत विस्ताराने मांडणी केली.