विक्रोळी : विक्रोळीतील पालिकेच्या क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालयात कार्डीयोलोजिस्ट व 2डी इको सुरू करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेलकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. योगेश भालेराव यांनी या संदर्भात रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. पद्मश्री अहिरे यांना निवेदन देत ही मागणी केली आहे.डॉ. योगेश भालेराव यांनी निवेदनात म्हटले आहे की, विक्रोळीत दिवसेंदिवस हृदय विकाराचे रुग्ण वाढत आहेत. असे असताना क्रांतिवीर महात्मा फुले रुग्णालयात कार्डीयोलोजिस्ट व 2डी इको उपलब्ध नसल्याने रुग्णांना राजावाडी रुग्णालय व सायन रुग्णालय गाठावे लागते . रुग्णाला खाजगी रुग्णालय गाठायचे झाल्यास त्याची फीस त्यांना परवडत नाही. तरी आपल्या विक्रोळीतील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी कार्डीयोलोजिस्ट व 2डी इको सुविधा सुरू करण्यात यावी अशी निवेदनातून मागणी करण्यात आल्याचे भालेराव यांनी सांगितले आहे.















