रत्नागिरी, (आरकेजी) : राजापूर तालुक्यातील अणसुरे येथून राजापूरच्या दिशेने येणारी एस.टी. बस आणि राजापूरातून सागवे येथे जात असलेल्या सुमो गाडीची कणेरी येथे समोरासमोर धडक झाली. या अपघातात सुमो चालकाचा मृत्यू झाला. २० प्रवासी जखमी झाले. यापैकी ३ जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतोष गंगाराम गोलीपकर(४५, रा. नाणार, बौद्धवाडी) असे मयत सुमो चालकाचे नाव आहे. गुरुवारी (ता. १२) दुपारी १ वा. च्या सुमारास हा अपघात घडला.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद देवकाते हे आपल्या ताब्यातील अणसुरे -राजापूर ही बस घेवून गुरुवारी दुपारी १२ वाजता अणसुरे येथून राजापूरच्या दिशेने निघाले. यावेळी बसमध्ये प्रल्हाद तेलंग हे वाहक होते. तर संतोष गोलीपकर हे आपल्या ताब्यातील प्रवासी वाहतूक करणारी सुमो गाडी घेवून राजापूरहुन सागवे येथे जात होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास कणेरी यथे दोन्ही वाहनांचे जोरदार धडक झाली. या अपघातात सुमोतील चालक संतोष गोलीपकर यांच्यासह सईदा मजीद बोरकर, झोया बोरकर व सुनंदा मेस्त्री हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चालक संतोष गोलीपकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातात भाग्यश्री शिरवडकर (२८), सुजाता साळवी (४५), सपना कदम(३३), मनिषा खडपे(४५,सर्व. रा. कणेरी), संपदा अवसरे(५०, पडवे), प्रभाकर कदम (६५, डोंगर), अशोक देवळेकर, सुंदर घाडी(नाणार),आरफीया मिरकर, जावेद पटेल,मुस्कान बाबाजी, नूरजहॉ पटेल, आशिया कुर्ले, भिकाजी तांबे, रामचंद्र खानविलकर, शिवराज कुळ्ये, रामचंद्र राघव, आरफीया शेतले हे किरकोळ जखमी झाले.