
रत्नागिरी, 21 June : मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बंद झालेली जिल्ह्यातील एसटी बससेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या जिल्ह्यात 136 गाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ही वाहतूक फक्त रत्नागिरी जिल्हाअंतर्गतच सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मार्च महिन्यात देशभर लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प होती. एसटी विभागाकडून मजुरांसाठी गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र ही वाहतूक वगळता एसटी बससेवा पूर्णपणे ठप्प होती. आता जिल्हाअंतर्गत वाहतूक गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आली असून, सुरुवातीला काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या.. त्यानंतर आता हळूहळू बस फेऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 136 गाड्यांद्वारे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या गाड्यांद्वारे सध्या 324 फेऱ्या सोडल्या जात आहेत. यामध्ये सर्वाधिक देवरुख बस स्थानकातून 32 गाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तसेच दापोलीतून 9, मंडणगडमधून 10, खेडमधून11, चिपळूणमधून 22, गुहागर मधून 17, लांजा 7, राजापूरमधून 11 गाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
सध्या एसटीमधून फक्त 22 प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा आहे.