रत्नागिरी (आरकेजी): एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसांच्या अघोषित संपामुळे एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पगारवाढी संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा अघोषित संप केला. या संपाची कोणतीही कल्पना प्रशासनाला नव्हती. शुक्रवारी सुरु झालेला हा संप परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या यशस्वी बैठकीनंतर शनिवारी रात्री मिटल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र या दोन दिवसात राज्यभर एसटी प्रशासनाला सहन करावं लागलं. संपामुळे एसटीच्या हजारो फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. संपूर्ण रत्नागिरी विभागातून दररोज 2142 फेऱ्या सोडल्या जातात. मात्र संपाच्या कालावधीत फक्त 25 ते 30 टक्केच फेऱ्या सोडण्यात आल्या. त्यामुळे संपाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 8 जून रोजी 1 लाख 41 हजार 690 किलोमीटर रद्द करण्यात आलं. त्यामुळे पहिल्या दिवशी रत्नागिरी विभागाला 89 लाख 79 हजार रुपयांचं नुकसान झालं. तर संपाच्या दुसऱ्या दिवशी 1 लाख 413 किलोमीटर रद्द करावं लागलं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी 66 लाख 82 हजार रुपयांचं नुकसान झालं. म्हणजेच दोन दिवसांत रत्नागिरी विभागाला तब्बल 1 कोटी 56 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान संपात सहभागी झालेल्या 90 लोकांवर लाईन ऑफची कारवाई करण्यात आली आहे.