मुंबई, (निसार अली) : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत मुलांना प्रवेश नाकारला, म्हणून मालाड पश्चिमेतील सेट जोसेफ हायस्कूल विरोधात आज मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, अनुदानित शिक्षण समिती आणि पालक यांनी आंंदोलन केले. यानंतर वठणीवर आलेल्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास होकार दिला. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती कॉम्रेड ए . सी . श्रीधरन यांनी दिली.
सेंट जोसेफ हायस्कूलसाठी ४० मुलांनी शिक्षण हक्क कायदाअंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्ज भरले होते. शाळेकडून त्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. अनेक वेळी शाळेशी बोलणी करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, आजच्या आंदोलनामुळे शाळा प्रशासनाला प्रवेशासाठी होकार द्यावा लागला. आंदोलनावेळी अनुदानित शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधीर पानसे, मुश्ताक मेस्त्री, समीर शेख आणि सुमारे दीडशे पालक व विद्यार्थी उपस्थित होते .