
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यात एसटी बसला शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात 23 जण जखमी झाले. यातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आलं आहे. सुरेखा सुरेश झोरे असं महिलेचं नाव आहे. संगमेश्वरमधल्या नायरी -निवळी घाटात हा अपघात झाला.
निवळी येथे वस्तीला असणारी एसटी बस आज सकाळी पावणेसातच्या सुमारास डेपोकडे येत असताना कापाच्यावाडी जवळील नायरी निवळी घाटामध्ये या बसला अपघात झाला. यावेळी गाडीने तीन पलट्या घेतल्या. गाडीत 28 प्रवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. 28 पैकी 23 प्रवासी जखमी झाले असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान अपघाताची माहिती कळताच अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीना स्थानिकांच्या रिक्षातून तसेच रुग्णवाहीकेतून संगमेश्वर ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील सुरेखा सुरेश झोरे यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुःखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आलं.
चालकाचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.














