
रत्नागिरी, (आरकेजी) : गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने रत्नागिरीहून लांजाच्या दिशेने येणाऱ्या एस . टी . च्या मिडीबसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसचे चालक, वाहक गंभीर जखमी झाले तर सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. दुपारी एकच्या सुमारास देवधे शेती शाळा दरम्यान ही घटना घडली. चालक व वाहक यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
लांजा आगारातील मिडिबस क्र. ( एम . एच . ०६ c . ८००६ ) चालक राजेंद्र महादेव पाटोळे ( वय – ५० ) रा . लांजा हे आपल्या ताब्यातील बस घेऊन लांजा ते रत्नागिरी गेले होते . रत्नागिरीहून लांजा येथे येत असताना देवधे शेती शाळा स्टाॅप येथे दुपारी आली. या ठिकाणी एक प्रवासी घेऊन बस पुढे काही अंतर जाताच गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनर हा मिडीबसला येऊन धडकणार हे लक्षात येताच बसचे चालक राजेंद्र पाटोळे यांनी आपली प्रसंगावधान दाखवून गाडी एका बाजूला नेली. मात्र भरधाव वेगात असलेला कंटेनर बसला धडक देत पुढे सरकला. यावेळी बेसावध असलेले वाहक सुरेश देवू जाधव ( वय – ५० ) हे बस मध्ये चढलेल्या प्रवाशाचे तिकीट काढत होते. अचानक झालेल्या अपघाताने वाहक जाधव यांच्या डोक्याला समोर असलेली लोखंडी दांडीचा लागली. ही दांडी त्यांच्या डोक्यात घुसली.
कंटेनर चालकाच्या साईटला येऊन धडकल्याने चालक राजेंद्र पाटोळे यांच्या छातीला आणि पायाला दुखापत झाली.
गाडीमध्ये मोजकेच प्रवासी असल्याने मोठा अनर्थ टळला. बेसावध असलेल्या प्रवाशांच्या डोक्याला , तोंडाला , हाताना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
मयुरी मंगेश देसाई ( वय – १८ ) रा . लांजा कनावजेवाडी, मंगेश वसंत शेट्ये ( वय – ३७ ) रा . रत्नागिरी कुवारबाव, राजकुमार विश्वचंद तिवारी ( वय – २९ ) रा . रत्नागिरी गोडावून स्टाॅप , शंकर काशीराम पांचाळ ( वय – ३२ ) रा. नेरले वैभववाडी , सुप्रिया सुभाष गिरकर ( वय – ३५ ) रा . हर्चे , अनुसया काशीराम पांचाळ ( वय – ६५ ) वैभववाडी , सतिश तुकाराम गावडे ( वय – ३७ ) रा . लांजा आदी प्रवासी किरकोळ जखमी झाले.