रायगड :- श्रीवर्धन मतदारसंघातील श्री स्वयंभू गुरुदत्त तीर्थक्षेत्राला पर्यटनाचा दर्जा देऊन विकसित करणार असल्याची ग्वाही, उद्योग व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे दिली. स्वयंभु गुरुदत्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तटकरे यांची मुंबईत भेट घेतली. दरम्यान, वरील आश्वासन दिल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी दिली.
श्रीवर्धन – म्हसळा तालुक्यातील वारळ गावी १९७२ मध्ये श्री स्वयंभू दत्त तीर्थक्षेत्र निर्माण झाले. महाराष्ट्रासह हिमालयातून साधक येथे साधना करण्यासाठी येतात. पाणी, निवारा, जीवनावश्यक वस्तू देखील मिळत नाहीत. सोयी- सुविधांअभावी मोठी गैरसोय आहे. येथे येणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या पवित्र ठिकाणाला पर्यटनाचा दर्जा देऊन विकसित करावा, तसेच हे ठिकाण पर्यटन क्षेत्राच्या नकाशावर आणावे, अशा मागणीचे निवेदन स्वयंभु गुरुदत्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री आदिती तटकरे यांची भेट देऊन दिले. मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटील, सचिव वैभव चाळके, स्वयंभु गुरुदत्त ट्रस्टचे सरचिटणीस जनार्दन चाळके, आपटेश्वर मंडळ नवानगर मुंबईचे अध्यक्ष मधुकर नाक्ति, मंडळाचे सल्लागार कुमार धुमाळ, खजिनदार जनार्दन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, श्री स्वयंभु गुरुदत्त तीर्थक्षेत्र विकसित करून महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राच्या नकाशावर आणण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन तटकरे यांनी मंडळाला दिले.